Join us

Champions Trophy: बीसीसीआयनं क्रिकेटर्सच्या बायका-पोरांसाठी लावलेली 'नो एन्ट्रीची' पाटी काढली; पण...

खेळाडूंच्या अगदी जिव्हारी लागलेला विषय म्हणजे फॅमिलीशिवाय मिशनवर जाणं. त्यात आलं एक खास ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:46 IST

Open in App

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील अपयशानंतर बीसीसीआयनं टीम इंडियातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला मोठा धक्का देणारा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) संघाला विजयपथावर आणण्यासाठी १० सूत्री नियमावली जाहीर  केली. यामुळे खेळाडूंवर अनेक बाबतीत निर्बंध आले आहेत. त्यातीलच खेळाडूंच्या अगदी जिव्हारी लागलेला विषय म्हणजे फॅमिलीशिवाय मिशनवर जाणं. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

क्रिकेटर्सच्या फॅमिलीला दुबईला जाऊन पाहता येणार सामना, पण..

बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, प्रत्येक दौऱ्यात खेळाडूंना आपल्या कुटुंबियांना सोबत नेता येणार नाही. मोठा दौरा असेल तर १४ दिवस फॅमिलीलासोबत ठेवता येईल, असा उल्लेखही बीसीसीआयच्या नियमावलीत करण्यात आला होता. पण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही दिर्घकाळ चालणारी नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंना बायका पोरांनासोबत नेण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची गोष्ट चांगलीच चर्चेत आली. आता यासंदर्भात नवी माहिती समोर आली आहे. आता बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंना थोडी सूट देत एका  मॅचसाठी फॅमिलीला बोलवण्याची परवानगी दिल्याचे समजते. खेळाडू फक्त एका सामन्यापुरतेच फॅमिलीसोबत राहू शकतात. त्यासाठीही एक अट पाळावी लागेल.  

काय आहे बीसीसीआयची अट अन् फॅमिलीसाठी नवा नियम

एका वृत्तामध्ये केलेल्या दाव्यानुसार,  बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील एका सामन्यासाठी फॅमिलीला बोलवण्याची परवानगी भारतीय संघातील खेळाडूंना दिली आहे. पण फक्त एका सामन्यासाठी ही परवानगी देण्यात आलीये. एक सामना पाहा, एक दिवस राहा आणि मग घरी जा अशा पद्धतीने परवानगी देण्यात आल्याचे बोलले जाते. कोणत्या मॅचसाठी कुटुंबातील मंडळी उपस्थितीत राहणार आहेत, याची पूर्व कल्पना खेळाडूनं बीसीसीआयला देणं अपेक्षित आहे.

भारत-पाक मॅचला तो योग जुळून येणार की, थेट फायनलला?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघ १५ फेब्रुवारीलाच दुबईत पोहचला आहे. बीसीसीआयच्या नियमावलीची पालन करत कुटुंबियांशिवायच संघातील खेळाडू दुबईला रवाना पोहचल्याचे पाहायला मिळाले. आता बीसीसीआयने फुल ना फुलाची पाकळी म्हणत एक दिवस सामना पाहण्यासह खेळाडूंना कुटुंबियांसोबत राहण्याची परवानगी दिलीये. भारत-पाक मॅच बघायला जिवलग मंडळी येणार की, फायनल ते बघण्याजोगे असेल.   

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ