भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील बीसीसीआयच्या मुख्यालयात सुरू आहे. या सभेमध्ये बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांची निवड झाली असून, माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांच्या नावावर बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब झालं आहे. आज त्यांच्या नावावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब होईल. रॉजर बिन्नी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मिथुन मन्हास यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला होता. तर राजीव शुक्ला यांची बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये असलेल्या बीसीसीआयच्या मुख्यालयात बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली आहे. या सभेमध्ये मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून जम्मू काश्मीर क्रिकेट संघटनेचे सदस्य असलेल्या मिथुन मन्हास यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी या बीसीसीआयच्या मागच्या दोन अध्यक्षांप्रमाणेच मिथुन मन्हास यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
दरम्यान, मिथुन मन्हास यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमध्ये क्रिकेटचा बऱ्यापैकी विकास झाला असून, अनेक दर्जेदार क्रिकेटपटू समोर आले आहेत. मिथुन मन्हास यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली आणि जम्मू काश्मीरच्या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच १५७ प्रथमश्रेणी सामन्यात २७ शतकांसह ९ हजार ७१४ धावा काढल्या आहेत. तर आयपीएलमध्ये ते दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स इंडिया आणि चेन्नई सुपरकिंग्स संघांकडून खेळले होते.