BCCI Cash Prize Team India Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शानदार कामगिरी केली. टीम इंडियाने न्यूझीलंडला ४ विकेट्सने हरवून विजेतेपद पटकावले. या दमदार विजयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) टीम इंडियाला मालामाल केले आहे. BCCI ने संपूर्ण संघासाठी रोख बक्षीस जाहीर केले आहे. ही रक्कम खेळाडूंसह प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांमध्येही वाटली जाणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली.
बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे म्हटले आहे की, "भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये टीम इंडियाच्या विजयासाठी ५८ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे." ही बक्षीसाची रक्कम खेळाडू तसेच प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी, निवड समितीच्या सदस्यांनाही दिली जाईल.
रोख बक्षीसाचे वाटप कसे होणार?
बक्षीस रकमेचा मुद्दा कसा वाटला जाणार याबाबत बीसीसीआयने तपशीलवार माहिती दिलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, ही रक्कम तीन विभागात वाटली जाऊ शकते. जे खेळाडू प्लेईंग ११ चा भाग होते त्यांना सर्वाधिक रक्कम, जे राखीव खेळाडू होते त्यांनी द्वितीय स्तराची रक्कम आणि सपोर्ट स्टाफमधील सर्वांना तृतीय स्तराची रक्कम दिली जाऊ शकते असा अंदाज आहे.
भारताने फायनलमध्ये न्यूझीलंडचा काटा काढला...
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २५१ धावा केल्या. यादरम्यान, डॅरिल मिशेलने ६३ धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात, भारताने ४९ षटकांत लक्ष्य गाठले. रोहित शर्माने अंतिम सामन्यात ७६ धावांची शानदार खेळी केली. श्रेयस अय्यरने ४८ धावांचे योगदान दिले. रोहितला सामनावीर निवडण्यात आले.
Web Title: BCCI announce Rs 58 crore cash prize for India’s Champions Trophy 2025 winning team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.