भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंध आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर पोहोचले आहेत. बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ बीसीसीआयने घेतलेल्या एका कठोर भूमिकेनंतर, आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने थेट २०२६ च्या टी-२० विश्वचषकावरच बहिष्कार टाकण्याचे संकेत दिले. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
वादाची ठिणगी कशी पडली?
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने कडक पवित्रा घेतला. बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सला त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रेहमानला संघातून काढून टाकण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट विश्वात संतापाची लाट उसळली आणि हा वाद केवळ एका खेळाडूापुरता मर्यादित न राहता दोन्ही देशांतील क्रिकेट युद्धात रुपांतरित झाला.
आम्ही भारतात टी-२० विश्वचषक खेळणार नाही- बांगलादेश
बीसीसीआयच्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशने आगामी टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येण्यास नकार दिला. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष शेखावत हुसेन यांनी नुकतेच एक खळबळजनक विधान केले. त्यांनी स्पष्ट केले की, "आम्ही २०२६ चा विश्वचषक भारतात खेळणार नाही. आयसीसीने आमचे सामने दुसऱ्या देशात हलवण्याबाबत विचार करावा." बांगलादेशने आपले सामने श्रीलंकेत आयोजित करण्याची मागणी आयसीसीकडे पत्राद्वारे केली आहे.
आयसीसीसमोर आता केवळ ३ पर्याय?
आयसीसीने बांगलादेश संघाला भारतात पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले असले, तरी बीसीबी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आता आयसीसीला या पेचातून सुटण्यासाठी तीन पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.
१) सामने श्रीलंकेत हलवणे: बांगलादेशची अट मान्य करून त्यांचे सामने 'हायब्रीड मॉडेल'नुसार श्रीलंकेत घेणे
२) बांगलादेशविना विश्वचषक: जर बांगलादेशने माघार घेतली, तर त्यांच्याशिवाय स्पर्धेचे आयोजन करणे.
३) कोलकाता पर्याय: जर बांगलादेशला सुरक्षेची चिंता असेल, तर त्यांचे सर्व सामने कोलकात्यात आयोजित करणे.
बीसीसीआयची भूमिका काय?
बीसीसीआयने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, भारताने राष्ट्रीय अस्मिता आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड न करण्याचे धोरण अवलंबले आहे. मुस्तफिजुर रेहमानला आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवणे, हा बांगलादेशला दिलेला एक मोठा राजनैतिक इशारा मानला जात आहे. खेळ आणि राजकारण यांची सरमिसळ झाल्यामुळे आशियाई क्रिकेटमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. आता आयसीसी या वादात मध्यस्थी करून विश्वचषकाचे भवितव्य कसे वाचवते, याकडे संपूर्ण क्रिकेट जगाचे लक्ष लागले आहे.