बांगलादेश महिला क्रिकेट संघाची कर्णधार निगार सुल्ताना जोटी हिच्यावर ज्युनियर खेळाडूंना मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आपल्या माजी सहकारी खेळाडूने केलेला हा दावा फेटाळताना निगार सुल्तानाने मात्र विनाकारण भारताची वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार हरमनप्रीत कौरला या वादात ओढले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बांगलादेशची अनुभवी जलदगती गोलंदाज जहानारा आलम हिने अलीकडेच महिला संघात भयावह प्रकार सुरू असल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. संघातील एका ज्युनियर खेळाडीनं कर्णधार निगार सुल्ताना तिच्यावर मारहाण करते, गैरवर्तन करते अशी तक्रार माझ्याशी केली, असा दावा जहानाराने केला होता. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना निगार सुल्तानाने पुन्हा विनाकारण हरमनप्रीत कौरचं नाव घेतलं आहे.
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
हरमनप्रीत कौरचा उल्लेख का केला?
'डेली क्रिकेट'ला दिलेल्या मुलाखतीत निगार सुल्तानानं सर्व आरोप फेटाळून लावले. ती म्हणाली की,
मी कुणाला का मारू? राग आला म्हणून बॅट स्टम्पवर मारायला मी हरमनप्रीत आहे का? कितीही राग आला तरी मी असं वागणार नाही. मला राग अनावर झाला तर मी माझी बॅट हेल्मेटवर किंवा बाजूला कुठेतरी आपटेन, तो माझा वैयक्तिक मामला आहे.
२०२३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरनं पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना रागाच्या भरात स्टम्पवर बॅट मारली होती. मारहाणीच्या प्रकरणात आपली बाजू मांडताना तिने विनाकारण जुन्या प्रकरण उकरुन काढत हरमनप्रीतचं नाव घेत आपण कूल कॅप्टन असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
आपली बाजू मांडताना ती नेमकं काय म्हणाली
मला जसं सर्वांसमोर दाखवलं गेलं, तशी मी अजिबात नाही. मी खरंच कोणाला मारहाण केली असती किंवा त्रास दिला असता तर टीम मॅनेजमेंट, मॅनेजर, कोचिंग स्टाफ हे सगळे आहेत ना? बांगलादेश महिला क्रिकेटमध्ये सगळं माझेच चालते का? ऑस्ट्रेलियात असलेल्या खेळाडूला ड्रेसिंग रुममधील अशी गोष्ट कोणी का सांगेल? खरंच असं काही असतं तर ती व्यक्ती इतर कुणालाही सांगू शकली असती.