Allah Gazanfar, Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीमधून माघार घेण्याऱ्या खेळाडूंची यादी वाढतच चालली आहे. बुमराह, कमिन्स, स्टार्क, नॉर्खिया यांसारखे वेगवान गोलंदाज स्पर्धेतून आधीच बाहेर पडले आहेत. काही जण दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर आहेत, तर काहींनी वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यातच आता १८ वर्षीय अल्लाह गझनफर देखील चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार आहे. दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) ने मिस्ट्री स्पिनर अल्लाह गजनफरला ४ कोटी ८० लाखांची बोली लावून यंदाच्या हंगामासाठी विकत घेतले आहे. पण आता या दुखापतीमुळे त्याच्या IPL समावेशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गझनफर चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर
अफगाणिस्तान संघ पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला आहे. स्पर्धेसाठी संघ जाहीर करताना त्यांनी अल्लाह गझनफरची निवड केली होती. पण आता त्याला दुखापतीमुळे बाहेर राहावे लागणार आहे. अफगाणिस्तानचा १८ वर्षीय फिरकी गोलंदाज अल्लाह गझनफर मनगटाच्या दुखापतीमुळे सुमारे ४ महिने क्रिकेटपासून दूर आहे. पण अद्यापही तो दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे गझनफर IPL पर्यंत तंदुरुस्त होईल की नाही, याबाबतही बऱ्याच चर्चा सुरु आहेत.
'या' खेळाडूने गझनफरची जागा घेतली
अल्लाह गझनफरच्या जागी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अफगाणिस्तान संघात २० वर्षीय नांगेयालिया खारोटी याला संधी देण्यात आली आहे. अल्लाह गझनफर आणि नांगेयालिया खारोटी या दोघांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभव जवळपास सारखाच आहे. गझनफरने ११ एकदिवसीय सामने खेळले आहेत, तर त्याच्या जागी आलेल्या खारोटीने ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. नांगेयालिया खारोटी हा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि हा अफगाणिस्तानसाठी एक प्लस पॉइंट ठरणार आहे.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये १९ फेब्रुवारीपासून अफिगाणिस्तानची सुरुवात होणार आहे. अफगाणिस्तानला आपला पहिला सामना कराचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना २१ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. यानंतर, अफगाणिस्तान संघाला २६ फेब्रुवारी रोजी इंग्लंड संघाविरुद्ध दुसरा सामना खेळावा लागेल. हा सामना लाहोरमध्ये खेळला जाईल. तर अफगाणिस्तान संघाला लाहोरमध्ये तिसरा सामना खेळायचा आहे, जो ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना २८ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.