चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तानचा संघ आता नव्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. एका बाजूला भारतीय संघातील खेळाडू आयपीएलची तयारी करत आहेत. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान संघाने न्यूझीलंड विरुद्ध दौऱ्यातील आंतरराष्ट्रीय टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंड दौऱ्यावरील मालिकेत बाबर आझमला रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी होती, पण आता त्याला ते शक्य होणार नाही. कारण त्याला पाकिस्तानच्या टी-२० संघात जागाच मिळालेली नाही. पाकिस्तान संघानं न्यूझीलंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या मालिकेसाठी जो संघ जाहीर केलाय त्यात बाबर आझमच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड आणखी काही काळ अबाधितच राहणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याच्या अगदी जवळ पोहचलाय बाबर, पण...
रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण या छोट्या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आजही रोहित शर्माच्या नावे आहे. रोहित शर्मानं आपल्या आंतरारष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत १५९ सामन्यात ४२३१ धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा स्टार बॅटर बाबर आझम हा त्याचा हा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याच्या अगदी जवळ आहे. यासाठी त्याला फक्त ९ धावांची गरज आहे. न्यूझीलंड दौऱ्यातील सामन्यात संघातच स्थान न मिळाल्यामुळे हा पराक्रम करण्यासाठी बाबर आझमला आता आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
सध्या तरी रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड अबाधितच
आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मापाठोपाठ बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान बॅटरनं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये खेळलेल्या १२८ सामन्यातील १२१ डावात ३ शतके आणि ३६ अर्धशतकाच्या मदतीने ४२२३ धावा केल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ या यादीत विराट कोहलीचा नंबर लागतो. कोहलीनं १२५ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ४१८८ धावा केल्या आहेत. रोहितसह कोहलीनं २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे बाबरच सध्या या यादीत टॉपला पोहचू शकतो. पण यासाठी त्याला आधी संघात स्थान मिळवायला हवे. तोपर्यंत रोहितचा हा वर्ल्ड रेकॉर्ड अबाधितच राहिल.