Team India's celebration after winning the U 19 World Cup 2026 : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने झिम्बाब्वेतील हरारेच्या मैदानात U19 वर्ल्ड कप स्पर्धेत विश्वविक्रमी विजयासह जेतेपदाचा 'षटकार' मारला. फायनलमध्ये नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीचा धमाकेदार १७५ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंड अंडर १९ संघासमोर ४१२ धावांचे विक्रमी लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३११ धावांवर आटोपला. कोणत्याही संघाने फायनलमध्ये मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला. एवढेच नाही तर या जेतेपदासह अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक वेळा जेतेपद मिळवण्याचा आपला विश्वविक्रम आणखी भक्कम केला आहे. दहा वेळा फायनल खेळताना युवा ब्रिगेडनं सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या ताफ्यातून एक शतक आले, पण...
भारतीय संघाने दिलेल्या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना केलैब मॅथ्यू फॅल्कनर याची शतकी खेळी ११५ (६७) आणि बेन डावकिन्स ६६ (५६) धावांच्या खेळीशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. गोलंदाजीत आंब्रिश याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय दिपेश देवेंद्रन आणि कौशिक चौहान यांनी प्रत्येकी २-२ तर कर्णधार आयुष म्हात्रे आणि खिलान पटेल याने प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
Under 19 World Cup 2026: अंडर-१९ वर्ल्डकपवर भारताचे नाव! फायनलमध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडिया सहाव्य...
युवा ब्रिगेडचा एकच जल्लोष, व्हिडिओ व्हायरल
विक्रमी विजयासह झिम्बाब्वेत तिरंगा फडकवल्यावर युवा टीम इंडियातील खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. आयुष म्हात्रे याने ट्रॉफी स्विकारल्यावर संघातील प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर स्पर्धेत एकही सामना न गमावता जेतेपद मिळवल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. कर्णधारासह संघातील खेळाडू ट्रॉफी उंचावून खास अंदाजात आनंद व्यक्त करताना पाहायला मिळाले. अभिमानास्पद कामगिरीनंतरचा खास क्षण दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.