Join us

अखेरचा चेंडू अन् शतकासाठी तीन धावांची गरज; जाणून घ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजानं काय केलं

बिग बॅश लीगमध्ये रविवारी पेचात पाडणारा प्रसंग ऑस्ट्रेलियाच्या डी'आर्सी शॉर्ट या फलंदाजावर ओढावला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 18:30 IST

Open in App

बिग बॅश लीगमध्ये रविवारी पेचात पाडणारा प्रसंग ऑस्ट्रेलियाच्या डी'आर्सी शॉर्ट या फलंदाजावर ओढावला. हॉबर्ट हरिकेन्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शॉर्ट ट्वेंटी-20त शतकाच्या उंबरठ्यावर होता आणि डावातील अखेरचा चेंडूचा सामना करण्यासाठी तो स्ट्राईकवर होता. त्याला त्या अखेरच्या चेंडूवर बिग बॅश लीगमधील दुसऱ्या शतकाची नोंद करण्यासाठी तीन धावांची गरज होती. त्या अखेरच्या चेंडूवर त्यानं जे काही केलं ते पाहण्यासारखं होतं.

हॉबर्ट हरिकेन्स आणि पर्थ स्कॉचर्स यांच्यात रविवारी सामना खेळवण्यात आला. हॉबर्टनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कॅलेब जेवेल आणि डी'आर्सी शॉर्ट यांनी हॉबर्टच्या डावाची सुरुवात केली. या दोघांची 69 धावांची भागीदारी 11व्या षटकात संपुष्टात आली. जेवेल 25 धावा करून माघारी परतला. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मिलरनं सुरुवात दणक्यात केली, परंतु तोही 15 धावांवर माघारी परतला. शॉर्टनं सामन्याची सूत्र हाती घेताना तुफान फटकेबाजी केली. त्याच्या खेळाच्या जोरावर हॉबर्टनं 2 बाद 180 धावा केल्या.

या सामन्यात शॉर्टनं डावातील अखेरच्या चेंडूचा सामना केला. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या शॉर्टला तीन धावांची गरज होती आणि समोर ख्रिस जॉर्डनसारखा कसलेला गोलंदाज होता. जॉर्डनचा तो यॉर्कर शॉर्टनं अचूक हेरला आणि फाईन लेगच्या दिशेनं चेंडू टोलावला. त्याचा प्रहार इतका जबरदस्त होता की चेंडू थेट सीमापार केला आणि शॉर्टनं बिग बॅश लीगमधील दुसरे शतक पूर्ण केले. शॉर्टनं 70 चेंडूंत 3 चौकार व 7 षटकार खेचून नाबाद 103 धावांची तुफानी खेळी खेळली. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाटी-20 क्रिकेट