किंग कोहलीचं शतकी कमबॅक त्याआधी यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुलनं केलेल्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघानं पर्थ कसोटी सामन्यात कांगारूंसमोर ५३४ धावांचं टार्गेट सेट केले आहे. विराट कोहलीचं शतक पूर्ण होताच भारतीय संघाचा कार्यवाहू कर्णधार जसप्रीत बुमराह याने भारतीय संघाचा दुसरा डाव ६ बाद ४८७ धावांवर घोषित केला. पहिल्या डावातील ४६ धावांच्या आघाडीच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघासमोर मोठं टार्गेट सेट केले.
धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के!
भारतीय संघानं सेट केलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला कॅप्टन जसप्रीत बुमराहनं पहिल्या षटकात धक्का दिला. ऑस्ट्रेलियन सलामीवीर नॅथन मॅक्सवीनी हा दुसऱ्या डावातील पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर बुमराहच्या जाळ्यात अडकला. त्याला खातेही उघडता आले नाही. दिवसाच्या खेळाची काहीच षटके शिल्लक असल्यामुळे पहिली विकेट पडल्यावर पॅट कमिन्स नाइट वॉचमनच्या रुपात मैदानात उतरला. पण सिराजनं त्याला तंबूचा रस्ता दाखवत ऑस्ट्रेलिया ९ धावांवर दुसरा धक्का दिला. धावफलकावर १२ धावा असताना बुमराहनं लाबुशेनेच्या रुपात कांगारूंना आणखी एक धक्का दिला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघाने १२ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या. उर्वरित २ दिवसांत त्यांना ५२२ धावा करायच्या आहेत. दुसरीकडे टीम इंडियाला विजयासाठी ७ विकेट मिळवायच्या आहेत.