सिडनी कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ धावांत आटोपल्यावर दुसऱ्या डावाला सुरुवात केली. भारतीय संघाच्या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. पण ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला ठराविक अंतराने धक्क्यावर धक्के दिले. परिणामी ५९ धावांवर विराट कोहलीच्या रुपात भारतीय संघानं तिसरी विकेट गमावली. कोहलीची विकेट पडल्यावर मैदानात उतरलेल्या रिषभ पंतनं पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारत आपलं खाते उघडले. धमाकेदार शो कायम ठेवत स्टार्कच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारत त्याने अर्धशतक साजरे केले. यासाठी त्याने २९ चेंडूचा सामना केला. भारताकडून टेस्टमधील हे दुसरं जलद अर्धशतक आहे. टीम इंडियाकडून कसोटीत सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम हा पंतच्या नावेच आहे. २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध बंगळुरुच्या कसोटी सामन्यात पंतनं २८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
दोन्ही डावात मिळून पंतन गाठला शंभरीचा आकडा
रिषभ पंतनं अर्धशतकानंतरही आपला तोरा कायम ठेवला. पण ३३ चेंडूत ६१ धावांवर तो तंबूत परतला. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रिषभ पंतनं आपली विकेट गमावली. सिडनी कसोटी सामन्यातील पहिल्या डावातही त्याने भारताकडून सर्वोच्च ४० धावांची खेळी केली होती. पहिल्या डावात ४०.८२ स्ट्राइक रेटनं धावा काढणाऱ्या पंतनं दुसऱ्या डावात १८४.८५ च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटल्या.
धकधक वाढवणारी अन् अनेक प्रश्न उपस्थितीत करणारी खेळी
रिषभ पंतची टेस्टमधील टी-२० स्टाइल फटकेबाजी ही धकधक वाढवणारी आणि काहींच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. कुणाला त्याचा हा अंदाज अगदी भारी वाटेल. पण काहीच्या मनात कसोटीत मैदानात थांबून खेळण्यापेक्षा अशा फटकेबाजीची गरज काय? असा प्रश्नही निर्माण करणारी आहे. पण सिडनीच्या मैदानात गोलंदाज आपला दबदबा निर्माण करत असताना त्याने वादळी खेळी करून टीम इंडियाला सामन्यात एक पाउल पुढे नेण्याचा डाव साधलाय, अशी परिस्थिती त्याने निर्माण केलीये, असंही त्याच्या खेळीत दिसून येते. त्याची ही खेळी सिडनी कसोटीच्या निकालातील टर्निंग पाइंट ठरू शकते.