Australia vs India 5th Test Day 3 IND 157 All Out : सिडनी कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळात बोलँड आणि पॅट कमिन्स यांनी पहिल्या तासाभराच्या आत ४ विकेट्स घेत टीम इंडियाला ऑल आउट केले आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात १५७ धावा करत पहिल्या डावातील ४ धावांच्या अल्प आघाडीसह ऑस्ट्रेलियासमोर १६२ धावांचे टार्गेट सेट केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर भारतीय संघ या धावांचा बचाव करण्यात यशस्वी ठरणार का ते पाहण्याजोगे असेल. जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे. जसप्रीत बुमराह बॅटिंगसाठी मैदानात उतरला. हा सीन टीम इंडियाला थोडा दिलासा देणारा होता. पण ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजीवेळी तो फिल्डवर न उतरल्यामुळे त्याच्याशिवाय टीम इंडियाचे अन्य गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुंग लावण्याचे मोठे चॅलेंज असेल.
१२ धावांत ४ विकेट्स
रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीनं ६ बाद १४५ धावांवरुन तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. या धावसंख्येत अवघ्या २ धावांची भर पडल्यावर जडेजाच्या रुपात ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स याने टीम इंडियाला सातवा धक्का दिला. त्याने ४५ चेंडूत १३ धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ पॅट कमिन्सनं वॉशिंग्ट सुंदरलाही १२ धावांवर माघारी धाडले. बोलँडनं मोहम्मद सिराज ४ (११) आणि जसप्रीत बुमराहच्या ०(३) रुपात तळाच्या दोन विकेट्स घेत भारतीय संघाचा दुसरा डाव १५७ धावांत आटोपला. भारतीय संघानं तिसऱ्या दिवसाच्या खेळात अवघ्या १२ धावांत ४ विकेट्स गमावल्याचे पाहायला मिळाले.
पंतची खेळी वगळता अन्य कुणाचाही लागला नाही निभाव
सिडनी कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात रिषभ पंतनं भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने तुफान फटकेबाजी करताना ३३ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. यशस्वी जैस्वाल २२ (३५), लोकेश राहुल १३ (२०), शुबमन गिल १३ (१२), रवींद्र जडेजा १३ (४५) आणि वॉशिंग्टन सुंदर १२ (४३) या खेळाडूंनी दुहेरी आकडा गाठला. पण त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. स्कॉट बोलँड याने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या पहिल्या डावात या गोलंदाजाने ४ विकेट्स घेतल्या होत्या.