Australia vs India 5th Test Day 2 Stumps : रिषभ पंतच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं दुसऱ्या दिवसाअखेर धावफलकावर ६ बाद १४१ धावा लावल्या आहेत. पहिल्या डावातील ४ धावांच्या अल्प आघाडीसह सिडनी कसोटी सामन्यात टीम इंडियानं १४२ धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी रवींद्र जडेजा ८ (३९) आणि वॉशिंग्टन सुंदर ६ (१७) ही जोडी मैदानात होती. तिसऱ्या दिवशी या जोडीसह अखेरच्या ४ विकेट्सच्या मदतीने टीम इंडिया ऑस्ट्रेलियासमोर किती धावांचे टार्गेट सेट करणार हे पाहण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या सलामी जोडीनं केली ४२ धावांची भागीदारी
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८१ धावांवर आटोपल्यावर टीम इंडियानं आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. आक्रमक अंदाजात बॅटिंग करत यशस्वी जैस्वालनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. दुसऱ्या बाजूला लोकेश राहुलही संयमी अंदाजात खेळताना दिसला. पण बोलँडनं ही सेट झालेली जोडी फोडत टीम इंडियाला पहिला धक्का दिला. तो आक्रमक अंदाजात खेळण्याच्या नादात लोकेश राहुल बाद झाला. त्याने १३ चेंडूत २० धावा केल्या. पहिल्या विकेसाठी यशस्वी सोबत त्याने ४२ धावांची भागीदारी रचली. यशस्वी जैस्वालच्या रुपात टीम इंडियाने आपली दुसरी विकेट गमावली. त्याने ३५ चेंडूत २२ धावा केल्या. ज्यात ४ चौकाराचा समावेश होता.
विराट-शुबमन गिलचा फ्लॉप
सलामी जोडी तंबूत परतल्यावर शुबमन गिल आणि विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण या दोघांनाी मैदानात तग धरता आला नाही. विराट कोहली पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फसला. पहिल्या तिन्ही विकेट्स बोलँडच्या खात्यात जमा झाल्या. शुबमन गिलच्या रुपात बो वेब्स्टरनं कसोटी कारकिर्दीतील आपलं पहिलं यश मिळवलं . गिल १५ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने १३ धावांवर बाद झाला. ७८ धावांवर टीम इंडियानं ४ विकेट्स गमावल्या होत्या.
रिषभ पंतची फटकेबाजी
त्यानंतर मैदानात उतरलेल्या रिषभ पंतनं तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. त्याने रवींद्र जडेजासोबत पाचव्या विकेटसाठी ४६ धावांची भागादारी रचली. पॅट कमिन्सनं सेट झालेल्या आणि स्फोटक अंदाजात खेळणाऱ्या पंतला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने ३३ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. ही खेळी टीम इंडियासाठी इम्पॅक्टफूल ठरू शकते. पंतची विकेट पडल्यावर नितीशकुमार रेड्डीकडून अपेक्षा होती. पण तो २१ चेंडूत ४ धावा करून बोलँडच्या गोलंदाजीवर बाद झाला.
टीम इंडिया किती धावांचं टार्गेट सेट करणार?
भारतीय संघाच्या गोलंदाजीवेळी जसप्रीत बुमराहनं अचानक मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले. तो पूर्णत: फिट असेल तर सिडनीच्या मैदानात चौथ्या डावात ऑस्ट्रेलियासाठी १५० ते १८० धावांचा पाठलाग करणंही जड जाईल. पण बुमराहच्या गोलंदाजीत पहिल्यासारखी धार दिसली नाही तर मात्र २२५ ते २५० धावाही अपुऱ्या पडतील. अजूनही टीम इंडियाच्या हातात चार विकेट्स आहेत. हे चार फलंदाज अधिकाधिक धावा करून ऑस्ट्रेलियासमोर कठीण आव्हान देण्यासाठी प्रयत्नशील असतील. तिसऱ्या दिवशी भारतीय संघ किती धावा करणार ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: Australia vs India 5th Test Day 2 Stumps Rishabh Pant Fifty Ravindra Jadeja Washington Sundar Not Out On Crease India Lead By 145 Runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.