Rishabh Pant Wicket : मेलबर्न बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रिषभ पंतकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्याने तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवातही अगदी झोकात केली. पण पडून पडून चेंडूवर तुटून पडण्याचा डाव त्याच्या अंगलट आला. स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर जो शॉट खेळण्याचा प्रयत्न फसला त्यातून काहीच धडा न घेता त्याने पुन्हा तोच शॉट ट्राय केला अन् रिषभ पंत फसला.
टी-२० तील बेस्ट शॉट तो टेस्टमध्येही करताना दिसतो ट्राय
दुसरीकडे बोलँडनं परफेक्ट सेटअपसह पंतचा काटा काढत टीम इंडियाला सहावा धक्का दिला. ऋषभ पंत हा आपल्या हटके फलंदाजी शैलीसाठी ओळखला जातो. टी-२०मधील बेस्ट शॉट तो अनेकदा टेस्टमध्येही खेळताना दिसते. पण नको त्या वेळी नको तो शॉट खेळून त्याने मेलबर्न कसोटी सामन्यात विकेट फेकली.
आधी फसला, पण त्यातून काहीच नाही शिकला!
तिसऱ्या दिवशी रिषभ पंत ६ (७) आणि रवींद्र जडेजा ४ (७) या जोडीनं ५ बाद १६४ धावांवरून टीम इंडियाच्या पहिला डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. पंतनं आपल्या आणि संघाच्या धावसंख्येत २२ धावांची भर घालून तंबूचा रस्ता धरला. भारताच्या पहिल्या डावातील ५६ व्या षटकात स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन फाइन लेगच्या दिशेने अगदी जमिनीवर पडून शॉट मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न फसला. पण तो सेफ राहिला.
हटके अंदाजामुळे पंतसह टीम इंडियाही गोत्यात
हा प्रयत्न फसल्यावर रिषभ पंतनं पुन्हा पुढच्या चेंडूवर तोच शॉट ट्रॉय केला. बोलंडनं चेंडू अगदी अचूक टप्प्यावर टाकत त्याचा हा प्रयत्न नुसता हाणून पाडला नाही तर त्याची विकेट्सही आपल्या खात्यात जमा केली. फाइन लेगच्या दिशेनं फटका खेळताना चेंडू बॅटच्या कडेवर लागला अन् थर्ड मॅनच्या दिशेनं चेंडू हवेत उडाला. लायननं कोणतीही चूक न करता त्याचा झेल टिपला. भारतीय संघानं १९१ धावांवर रिषभ पंतच्या रुपात सहावी विकेट गमावली. रवींद्र जडेजा आणि रिषभ पंत या जोडीकडून मोठी अपेक्षा होती. पण या दोघांनी सहाव्या विकेटसाठी फक्त ३२ धावांची भागीदारी केली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतची सुमार कामगिरी
रिषभ पंत हा बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील कसोटी मालिकेत सातत्याने अपयशी ठरला आहे. पर्थच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने ३७ धावांची खेळी केली होती. ही त्याची आतापर्यंतच्या या मालिकेतील सर्वोच्च खेळी ठरली. याच कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात तो अवघ्या एका धावेवर बाद झाला होता. त्यानंतरच्या कसोटी डावात २१, २८ आणि ९ धावा केल्यावर पाचव्या डावात तो २८ धावा करून बाद झाल्याचे पाहायला मिळाले.