Australia vs India 4th Test Day 4 : मेलबर्नच्या मैदानात सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात नितीशकुमार रेड्डीनं केलेल्या ११४ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघानं पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. पहिल्या डावातील ४७४ धावांच्या जोरावर चौथ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी १०५ धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. नितीशकुमार रेड्डी १०५ (१७६) आणि मोहम्मद सिराज २ (७) यांनी चौथ्या दिवशी ९ बाद ३५८ धावांवर खेळाला सुरुवात केली. ११ धावांची भर घातल्यावर नॅथन लायन याने नितीशकुमार रेड्डीच्या खेळीला ११४ (१८९)ब्रेक लावत भारतीय संघाचा पहिला डाव ३६९ धावांवर संपुष्टात आणला. मोहम्मद सिराज १५ चेंडूत ४ धावांवर नाबाद राहिला.
नितीशकुमार रेड्डीची शतकी खेळी अन् वॉशिंग्टनसोबतची 'सुंदर' भागीदारी
भारतीय संघाच्या पहिल्या डावात नितीशकुमार रेड्डीचं शतकी खेळी ही एकदम खास राहिली. त्याने १८९ चेंडूचा सामना करताना ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ११४ धावांची खेळी केली. या खेळीनं टीम इंडियाला खऱ्या अर्थानं मॅचमध्ये आणलं. त्याला वॉशिंग्टन सुंदरनं ५० (१६२) अर्धशतकी खेळीसह उत्तम साथ दिली. दोघांनी आठव्या विकेटसाठी १२७ धावा केल्या.
यशस्वी जैस्वालचीही दमदार खेळी, ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क विकेटलेस
भारतीय संघाकडून युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याच्या भात्यातूनही मोठी खेळी आली. त्याने ११८ चेडूत ११ टौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८२ धावा केल्या. विराट कोहलीसोबतच्या ताळमेळाच्या अभावानं यशस्वीनं आपली विकेट गमावली होती. पण त्याच्या या धावाही संघासाठी एकदम मोलाच्या ठरल्या. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावातील त्याची ही सर्वोच्च खेळीही ठरली.ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन पॅट कमिन्स याच्यासह स्कॉट बोलँड आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्कनं २५ षटके गोलंदाजी केली. पण त्याला एकही विकेट मिळाली नाही.
बुमराह-आकाशदीपच्या पदरी भोपळा, रोहितला गाठता आला नाही दुहेरी आकडा
पहिल्या डावात लोकेश राहुल २४ (४२), विराट कोहली ३६ (८६), रिषभ पंत २८ (३७) आणि रवींद्र जडेजा १७ (५१) यांनी दुहेरी आकडा गाठला. पण या खेळीच मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात ते चुकले. दुसरीकडे आकाशदीप आणि बुमराहला खातेही उघडता आले नाही. कर्णधार रोहित शर्माला पहिल्या डावात दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आले. तो अवघ्या ३ धावांवर बाद झाल्याचे पाहायला मिळाले.