AUS vs IND, 4th Test Day 3 Stumps : बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय आघाडीच्या फळीतील स्टार फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीमुळे टीम इंडिया पुन्हा अडचणीत सापडली होती. पण दबावात तळाच्या फलंदाजीत नितीशकुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या दमदार शतकी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाअखेर धावफलकावर ९ बाद ३५८ धावा लावल्या आहेत.
तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघ ११६ धावांनी पिछाडीवर
वॉशिंग्टन सुंदर अर्धशतकी खेळी करून माघारी फिरल्यावर नितीशकुमार रेड्डीनं आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल शतक झळकावल. अंधूक प्रकाशामुळे खेळ नियोजित वेळेआधीच थांबला. त्यावेळी नितीशकुमार रेड्डी १७६ चेंडूत १० चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १०५ धावांवर खेळत होता. दुसऱ्या बाजूला मोहम्मद सिराज ७ चेंडूचा सामना करून २ धावांवर खेळत होता. भारतीय संघ अजूनही ११६ धावांनी पिछाडीवर आहे.
तिसऱ्या दिवशी पंत-जड्डूकड़ून होती आस, पण त्यांना काहीच करता आलं नाही खास
युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल सोडला तर अन्य एकालाही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर मैदानात तग धरता आला नाही. दुसऱ्या दिवशीच्या खेळात भारतीय संघानं अवघ्या १६४ धावांत अर्धा संघ तंबूत परतला होता. तिसऱ्या दिवशी रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा या भारतीय जोडीनं ५ बाद १६४ धावांवरून खेळ पुढे नेण्यास सुरुवात केली. पण धावफलकावर २०० धावा लागण्याआधीच रिषभ पंत २८ (३७) आउट झाला. रवींद्र जडेजाच्या रुपात टीम इंडियानं २२१ धावांवर सातवी आणि तिसऱ्या दिवसांतील दुसरी विकेट गमावली.
तळाच्या फलंदाजांनी आघाडीच्या फलंदाजांना दिला बॅटिंगचा धडा
भारतीय संघाच्या धावफलकावर ७ बाद २२१ अशी धावसंख्या असताना तळाच्या फलंदाजीत नितीशकुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीनं सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत अप्रतिमरित्या लढा दिला. या दोघांनी मैदानात तग धरून केलेली खेळी आघाडीच्या फ्लॉप ठरलेल्या फलंदाजांनी धडा देणारी आहे. धावा करायच्या तर मैदानात थांबवं लागतं. हीच गोष्ट त्यांनी प्रत्येकी १५० पेक्षा अधिक चेंडू खेळून दाखवून दिली. नितीश कुमारनं वॉशिंग्टन सुंदरच्या आठव्या विकेटसाठी १२७ धावांची बहुमूल्य भागीदारी रचली. या दरम्यान वॉशिंग्टन सुंदरनं कसोटीतील आपलं चौथं अर्धशतक झळकावलं. नितीश कुमारनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातूनच टीम इंडियात एन्ट्री मारली होती. मेलबर्नच्या मैदानातील सेंच्युरीसह त्याने आपल्यातील प्रतिभा दाखवून दिली आहे.
Web Title: Australia vs India 4th Test Day 3 Stumps Nitish Reddy slams maiden Test century After Washington Sundar Fifty India scored 358 For 9 at stumps trail by 116 runs at MCG
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.