Join us

यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

ऑस्ट्रेलियात अशी कामगिरी करून दाखवणारा तो तिसरा भारतीय ठरलाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 08:39 IST

Open in App

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्यात भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालनं  शतकी खेळी साकारली आहे. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या यशस्वीनं दुसऱ्या डावात सिक्सर मारत अगदी दाबात शतक पूर्ण केले. या शतकी खेळीसह ऑस्ट्रेलियन मैदानात पहिला कसोटी सामना खेळताना शतक झळकावणारा तो भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. यासह त्याने लिटल मास्टर गावसरांच्या खास क्लबमध्ये  एन्ट्री मारली आहे.

ऑस्ट्रेलियात पहिला कसोटी सामना खेळताना सर्वोच्च धावसंख्या उभारणारे भारतीय

  • एम जयसिंहा (१९६८) १०१ धावा
  • सुनील गावसकर (१९७७) ११३ धावा
  • मुरली विजय ९९ धावा (२०१४)
  • फारुख इंजिनियर ८९ (१९६७)

लोकेश राहुलसोबत सलामीसाठी द्विशतकी भागीदारी

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल या दोघांनी मिळूनही खास विक्रमाला गवसणी घातलीये. गावसकर आणि के श्रीकांत या जोडीला मागे टाकत यशस्वी-राहुल ऑस्ट्रेलियात भारताकडून सर्वोच्च सलामी भागीदारी नोंदवणारी जोडी ठरली आहे. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी २०१ धावांची भागीदारी रचली. याआधी गावसकरांनी के श्रीकांत यांच्यासोबत १९३ धांचांची भागीदारी रचल्याचा विक्रम होता. सेना देशांत विचार करायचा तर यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल यांनी सलामीला केलेली तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी आहे.

सिक्सर किंगचाही  ताज

यशस्वी जैस्वाल याने पर्थ कसोटीतील सामन्यात दुसरा षटकार मारत दहा वर्षांपूर्वीचा ब्रेंडन मॅक्युलनचा रेकॉर्ड मोडीत काढला होता. कसोटीत एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड आता यशस्वीच्या नावे आहे.  ३५ प्लस षटकारांसह त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या हंगामात सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याच्या जो रुटच्या विक्रमाशीही बरोबरी केली होती.

 

टॅग्स :यशस्वी जैस्वालभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया