पर्थच्या मैदानात सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ४०० पेक्षा अधिक धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुलनं सेट केलेल्या प्लॅट फॉर्मवर विराट कोहलीही रंगात आल्याचे पाहायला मिळाले.
यशस्वी-KL राहुल जोडीनं सेट केला नवा विक्रम
दुसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाचा डाव १०४ धावांत आटोपल्यावर भारतीय संघानं आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवसाअखेर १७६ धावा करत नाबाद राहिलेल्या भारताच्या सलामी जोडीनं तिसऱ्या दिवसाच्या खेळात द्विशतकी भागीदारीसह खास विक्रम रचला. यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी २०१ धावांची दमदार भागीदारी केली. ऑस्ट्रेलियन मैदानात भारतीय संघाच्या सलामी जोडीनेच नव्हे तर एकंदरीत केलेली ही सर्वोच्च भागीदारी आहे.
लोकेश राहुलची शतकी संधी हुकलीलोकश राहुलला या सामन्यात शतकी खेळीची संधी होती. पण १७६ चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने ७७ धावांची खेळी करत तो बाद झाला. मिचेल स्टार्कला ही विकेट मिळाली. त्याची जागा घेण्यासाठी आलेला देवदत्त पडिक्कल याने मैदानात तग धरला. पण ७१ चेंडूत २५ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लागला. ही विकेट जोश हेजलवूडच्या खात्यात जमा झाली.
यशस्वी द्विशतक करण्याचा मूडमध्ये दिसला, पण... पहिल्या डावात भोपळा पदरी पडलेल्या यशस्वी जैस्वालनं रंग बदलल्या खेळपट्टीवर क्लास खेळीचा नजराणा पेश केला. त्याने २९७ चेंडूत १६१ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. यशस्वी द्विशतकाच्या मूडमध्ये दिसत होता. पण जोडी फोडण्यात माहिर असणाऱ्या मिचेल मार्शनं त्याला आउट केले. त्यानंतर लायननं पंतला तर पॅट कमिन्सनं ध्रुव जुरेलला आउट केले. दोघांनी प्रत्येकी १-१ धाव काढली.
किंग कोहलीची फिफ्टीलोकेश राहुल आणि यशस्वी जैस्वालच्या दमदार खेळीनंतर कोहलीच्या भात्यातूनही अर्धशतक आले आहे. कोहलीचे कसोटी कारकिर्दीतील हे ३२ वे अर्धशतक असून ऑस्ट्रेलियातील त्याची ही पाचवी फिफ्टी आहे. भारतीय संघाने ४०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली असून किंग कोहलीच्या जोरावर भारतीय संघ कांगारूंसमोर ५०० पेक्षा अधिक धावांचे टार्गेट सेट करण्याचा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.