Join us

वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक

वर्षभराची प्रतिक्षा संपली, कोहलीच्या भात्यातून आली सेंच्युरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 14:52 IST

Open in App

Virat Kohli  Break Sir Donald Bradman's Century Record  : घरच्या मैदानात न्यूझीलंड आणि बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरलेल्या किंग कोहलीनं पर्थच्या कसोटीत कमालीची कामगिरी करून दाखवली. वर्षभराचा शतकी दुष्काळ संपवत त्याने कसोटी कारकिर्दीतील ३० वे कसोटी शतक झळकावले आहे. कोहलीनं २१ जूलै  २०२३ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध अखेरचं कसोटी शतक झळकावले होते. त्यानंतर आता त्याच्या भात्यातून शतक पाहायला मिळाले आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या घरच्या मालिकेत ३ कसोटी सामन्यात मिळूनही त्याला शंभरीचा आकडा गाठता आला नव्हता. पर्थच्या मैदानातील शतकासह त्याने कसोटीत सर्वाधिक   शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे. कोहलीनं १४३ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद शंभर धावा केल्या. त्याच्या शतकानंतर भारतीय संघानं आपला दुसरा डाव  ४ बाद ४८७ धावांवर घोषित करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ५३४ धावांचे टार्गेट सेट केले आहे.

पर्थच्या मैदानात कोहलीची दमदार कामगिरी

पर्थच्या मैदानात विराट कोहलीची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. २०१२ मध्ये किंग कोहलीनं या मैदानात पहिला कसोटी सामना खेळला होता. या दौऱ्यात त्याने पहिल्या डावात ४४ धावा आणि ७५ धावा अशी खेळी केली होती. हा सामना भारतीय संघाने जिंकला होता. या मैदानात किंग कोहलीचं पहिलं शतक हे २०१८ च्या दौऱ्यावर आले.  त्यावेळी २५७ चेंडूत कोहलीनं १२३ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात त्याने १७ धावा काढल्या होत्या. पण या सामन्यात टीम इंडियाला १४६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी त्याचे शतकानंतर टीम इंडिया विजयी होणार, असे चित्र स्पष्ट दिसत आहे. कारण ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाने ५०० पेक्षा अधिक धावांचे टार्गेट ठेवले आहे. 

टीम  इंडियासह कोहलीसाठी 'अच्छे दिन'चे संकेत

घरच्या मैदानातील बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली अपयशी ठरला होता. त्यात न्यूझीलंड विरुद्धची मालिका टीम इंडियाने ३-० अशी गमावली. या लाजिरवाण्या पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ४-० असा विजय नोंदवण्याचे चॅलेंज आहे. पर्थ कसोटी सामन्यात कोहलीचं शतक आणि टीम इंडियाने उभारलेला धावांचा डोंगर यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी करून दाखवण्यात तयार आहे, याचे संकेत मिळाले आहे. पर्थच्या मैदानात टीम इंडिया आणि विराट कोहलीसाठी 'अच्छे दिन'चे संकेत मिळाले आहेत.

 

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया