AUS vs IND, 1st Test , Mitchell Starc Dismisses Yashasvi Jaiswal Duck : बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पर्थ कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमरानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वालच्या साथीनं लोकेश राहुलनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालवर सर्वांच्या नजरा होत्या. कारण तो ऑस्ट्रेलियन मैदानात पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. पण यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी ठरला आहे. खातेही न उघडता त्याला तंबूत परतावे लागले.
शॉट सिलेक्शनमध्ये चुकला अन् स्टार्कच्या गोलंदाजीवर फसला
भारताच्या डावातील तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कनं आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून देत टीम इंडियाला पहिला धक्का दिला. यशस्वी जैस्वाल याने ८ चेंडूचा सामना केला. पण त्याला खातेही उघडता आले नाही. स्टार्कच्या गोलंदाजीवर शॉट सिलेक्शन करायचा चुकला अन् तो ऑस्ट्रेलियन संघाकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या नॅथन मॅक्सवीनीनं त्याचा झेल टिपला.