Join us

"चूक झाल्यावर कधीतरी माफी मागत जावा", वर्ल्ड कपमध्ये खराब अम्पायरिंग; वॉर्नरची मोठी मागणी

स्टीव्ह स्मिथ आणि मार्कस स्टॉयनिस यांना दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात बाद घोषित केल्यानंतर वादाला तोंड फुटले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 15:58 IST

Open in App

वन डे विश्वचषकात ज्या पद्धतीने अम्पायरिंग सुरू आहे यावर प्रश्न उपस्थित करत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने एक मोठी मागणी केली आहे. वॉर्नरने खराब अम्पायरिंगचा दाखला देत सडकून टीका केली. वॉर्नरच्या मागणीनुसार, ज्या पद्धतीने फलंदाजांची आकडेवारी मोठ्या स्क्रीनवर दाखवली जाते, त्याच पद्धतीने अम्पायर्सची देखील कामगिरी दाखवायला हवी. 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि मार्कस स्टॉयनिस यांना दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात बाद घोषित केल्यानंतर वादाला तोंड फुटले. यावर अनेक जाणकारांनी आपापली प्रतिक्रिया दिली. काही जाणकारांच्या म्हणण्यानुसार चुकीच्या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियाला दोन खेळाडू गमवावे लागले. याशिवाय श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात वॉर्नरला एका वादग्रस्त निर्णयावर बाद घोषित केले गेले. वॉर्नरने अम्पायरच्या निर्णयाला आव्हान देताना तिसऱ्या पंचाची मदत घेतली पण काहीच फायदा झाला नाही. 

अम्पायर्सची आकडेवारी दाखवायला हवी - वॉर्नर 'द सिडनी मॉर्निंग हेराल्ड'ने दिलेल्या वृत्तानुसार, फलंदाज खेळपट्टीवर येताच त्याची आकडेवारी मोठ्या स्क्रीनवर दाखवली जाते. त्यामुळे अम्पायर्सची देखील आकडेवारी दाखवणे गरजेचे आहे. हे काही लीग क्रिकेटमध्ये केले जाते. मला वाटते की, असे केल्याने सर्वांसाठी सोयीस्कर होईल आणि प्रेक्षकांसाठीही ही खूप चांगली गोष्ट असेल, अशी मागणी डेव्हिड वॉर्नरने केली आहे. 

तसेच पॅडवर चेंडू लागल्यावर कोणता अम्पायर ५०-५० चा निर्णय देणार आहे हे सर्वांना कळायला हवे. त्यामुळे एक खेळाडू म्हणून मला कधीकधी असे वाटते की पंचांना जबाबदार धरले पाहिजे. कोणताही निर्णय चुकला असेल तर तो मान्य करून त्यांनी कधीतरी माफी मागावी. असे केल्यास खेळाडू तुम्हाला शिक्षा ठोठावणार नाहीत, अशा शब्दांत वॉर्नरने आपला राग व्यक्त केला. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपडेव्हिड वॉर्नरआॅस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथ