Join us  

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे 'बुरे दिन'; 34 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आली 'अशी' वेळ

पाच विश्वचषक जिंकणाऱ्या कांगारुंची सध्याची कामगिरी निराशाजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 1:44 PM

Open in App

मुंबई: सर्वाधिक क्रिकेट विश्वचषक पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची एकदिवसीय क्रिकेटमधील सध्याची कामगिरी अतिशय वाईट आहे. पाचवेळा विश्वचषक स्पर्धा जिंकणारा कांगारुंचा संघ सध्या आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत सहाव्या स्थानावर घसरला आहे. 34 वर्षांमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघावर अशी वेळ आली आहे. आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंडचा संघ अव्वल स्थानी आहे. 1984 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी क्रमवारीत सहाव्या स्थानी होता. यानंतरच्या आठपैकी पाच विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियानं संघानं खिशात घातल्या. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये चेंडूशी छेडछाड केल्यानं बदनाम झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला एकदिवसीय सामन्यांमध्येही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. मात्र यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. 2016-17 पासूनच्या एकदिवसीय सामन्यांचा विचार केल्यास, कांगारुंची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. कधीकाळी प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडचं पाणी पळवणारा हा संघ 2016-17 पासून झालेल्या 15 पैकी 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. त्यामुळे इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि पाकिस्ताननं आयसीसीच्या क्रमवारीत कांगारुंना मागे टाकलं आहे. आयसीसीच्या क्रमवारीत इंग्लंडचा संघ 124 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. यानंतर भारत (122), दक्षिण आफ्रिका (113), न्यूझीलंड (112), पाकिस्तान (102) यांचा क्रमांक लागतो.  

टॅग्स :आॅस्ट्रेलियाक्रिकेटआयसीसीभारतइंग्लंडद. आफ्रिका