Beau Webster Spinner Wicket Video, SL vs AUS 2nd Test : श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना ६ फेब्रुवारीपासून सुरू झाला. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यान सामन्यात एका ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने फिरकी गोलंदाजी सुरू केली. त्याहूनही आश्चर्यकारक म्हणजे त्याने पाचव्या चेंडूवर बळीही मिळवला. वेगवान गोलंदाजी थांबवून अचानक फिरकीपटू झालेला हा गोलंदाज म्हणजे ब्यू वेबस्टर. खेळपट्टीवर फिरकीला मदत मिळते म्हणून त्याने सहज प्रयत्न केला आणि ऑफ स्पिन गोलंदाजीवर त्याला विकेट मिळाली. त्याच्या या विकेटचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
ब्यू वेबस्टरची आशियातील पहिली विकेट
पहिल्या कसोटीत ब्यू वेबस्टरला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. पण दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात कर्णधार स्टीव्ह स्मिथने त्याला गोलंदाजी करायला दिली. वेबस्टरने त्या संधीचं सोनं केलं. आशियात उपखंडातील त्याचे हे पहिलेच कसोटी षटक होते. त्याने वेगवान गोलंदाजी ऐवजी फिरकी गोलंदाजीला सुरुवात केली आणि ५व्या चेंडूवर रमेश मेंडिसला बाद केले. फॉरवर्ड शॉर्ट-लेगवर ट्रेव्हिस हेडने त्याला झेलबाद केले. अशाप्रकारे वेबस्टरने आशियातील त्याची पहिली विकेट घेतली. पाहा व्हिडीओ-
ब्यू वेबस्टरने अलीकडेच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान भारताविरुद्ध सिडनी कसोटीत पदार्पण केले. मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने ५७ आणि ३९ धावांच्या शानदार खेळी केल्या आणि ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकण्यास मदत केली. तसेच त्याने एक विकेटही घेतली. तो सध्या त्याचा तिसरा कसोटी सामना खेळत आहे. या खेळपट्टीवर फिरकीपटूंना खूप मदत मिळत होती. त्यामुळेच सामन्यात कर्णधार स्मिथने त्याला फिरकी गोलंदाजी करायला लावली आणि त्यात त्याला यश आले.