चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील चारही सेमीफायनलिस्ट ठरले आहेत. पण सेमी फायनलमध्ये कोणता संघ कुणाविरुद्ध भिडणार ते अजून गुलदस्त्यातच आहे. यामागचं कारण 'ब' गटात दक्षिण आफ्रिका अव्वल अन् ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर हे चित्र स्पष्ट झाले असले तरी 'ब' गटातून भारत-न्यूझीलंड यांच्यात नंबर वन आणि नंबर दोन संघ कोणता ते ठरलेले नाही. ही परिस्थिती 'ब' गटातील दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघाची डोकेदुखी वाढवणारी आहे. कारण कुणासोबत खेळायचं हे फिक्स नसल्यामुळे त्यांना प्रवासाचे नियोजन करण्याची कसरत करावी लागणार आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय संघ पहिली सेमी फायनल दुबईत खेळणार ते ठरलंय
सुरक्षिततेच्या कारणास्तव भारतीय संघानं पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्यावर हायब्रिड मॉडेलनुसार, टीम इंडियाचे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्व सामने दुबईत खेळवण्यात येत आहेत. भारतीय संघ गटात कोणत्याही स्थानावर राहिला तरी ४ मार्चला टीम इंडिया दुबईत पहिली सेमी फायनल खेळेल.
यजमान पाक, नियोजन भारताच्या अवतीभोवती, दक्षिण आफ्रिकेसह ऑस्ट्रेलियाची झालीये अशी गोची
भारतीय संघाचे नियोजन ठरलेले असल्यामुळे आता 'ब' गटातील दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांना दुबईची फ्लाइट पकडावी लागेल. कारण आयत्या वेळी भारतासोबत सेमी फायनल खेळायचे ठरले तर दुबईत त्यांना सराव सामना खेळता येणार नाही. बीबीसीच्या वृत्तानुसार, ही गोष्ट लक्षात ठेवून दोन्ही संघ भारत-न्यूझीलंड सामन्याच्या दिवशीच दुबईला पोहचतील. ज्या संघाला भारतीय संघासोबत सेमी फायनल खेळायची तो तिथेच थांबेल अन् न्यूझीलंडसह दुसरा संघ लाहोरमधील दुसऱ्या सेमीफायलसाठी पुन्हा पाकिस्तानात येईल. हा सामना ५ मार्चला नियोजित आहे. खेळ इथेचं थांबणार नाही. तिकडे भारतीय संघानं फायनल गाठल्यावर पुन्हा लाहोरमध्ये जिंकणाऱ्या संघाला दुबईची फ्लाइट पकडावी लागेल. कारण भारत फायनलमध्ये पोहचल्यावर फायनल दुबईतच खेळवली जाणार हेही आधीच ठरलंय. हा सीन म्हणजे यजमान पाकिस्तान असले तरी रुबाब भारताचा असाच काहीसा सीन दाखवणारा आहे.
इतर संघांना करावी लागणारी 'कसरत' भारतीय संघासाठी अतिरिक्त फायदा देणारी
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अन्य संघ आधीच इकडून तिकडे प्रवास करत आहेत. पण भारतीय संघ एकमेव असा आहे जो एकाच ठिकाणी स्थिर आहे. ना ठिकाण बदलतंय ना वातावरण. त्यामुळे दुबईत माहोल निर्माण करून चॅम्पियन्स होण्याचा डाव साधण्याची नामी संधी टीम इंडियाकडे आहे. दुसऱ्या बाजूला इतर संघांना प्रवासाची करावी लागणारी 'कसरत' त्यांच्यासाठी नाहक मनस्ताप करणारी ठरू शकते. याचा खेळाडूंच्या खेळावरही परिणाम होऊ शकतो. ही गोष्ट भारतीय संघासाठी अतिरिक्त लाभ ठरेल, अशी आहे.