Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS: ऑस्ट्रेलियन संघात 7 वर्षीय फिरकीपटूला स्थान; बॉक्सिंग डे कसोटीत भारतासमोर नवं आव्हान

विराटला बाद करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या आर्ची शिलरला संघात स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 21:28 IST

Open in App

मेलबर्न: पर्थ कसोटीत भारताचा पराभव करत कसोटी मालिकेत बरोबरी साधणारा ऑस्ट्रेलियन संघ बॉक्सिंग डे कसोटीसाठी सज्ज झाला आहे. 26 डिसेंबरपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या हेतूनं दोन्ही संघ मैदानात उतरतील. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानं संघात मोठा बदल केला आहे. सात वर्षांचा फिरकीपटू आर्ची शिलरला ऑस्ट्रेलियन संघात स्थान देण्यात आलं आहे. बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियानं 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला. यामध्ये आर्ची शिलरला 15 वा खेळाडू म्हणून संधी देण्यात आली. कसोटी मालिकेतील पहिला सामना अॅडलेडवर झाला. त्यावेळी शिलरनं ऑस्ट्रेलियन संघासोबत सराव केला होता. त्यानंतर आता त्याला तिसऱ्या कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. शिलरच्या निवडीला ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेननंदेखील दुजोरा दिला आहे. यारा पार्कमध्ये बुपा फॅमिली डे आयोजित करण्यात आला. त्यावेळी शिलरच्या निवडीबद्दल पेनला प्रश्न विचारण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात निवड झाल्याची माहिती शिलरला यंदाच्या ऑक्टोबरमध्ये देण्यात आली होती. त्यावेळी कांगारुंचा संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळत होता. मला विराट कोहलीला बाद करायचं आहे, अशी इच्छा त्यावेळी शिलरनं ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्याकडे बोलून दाखवली होती. मला राष्ट्रीय संघाचा कर्णधार व्हायचं आहे, असा मानस शिलरनं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळाशी संवाद साधताना व्यक्त केला.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया