Join us

पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई

Tim David Batting: टिम डेव्हिडने ५२ चेंडूत ८३ धावा कुटल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 09:57 IST

Open in App

Tim David Batting : ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १७ धावांनी पराभूत केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने १७८ धावा केल्या. ७५ धावांत ६ बळी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाची गाडी रुळावरून घसरली असे वाटत होते. पण टिम डेव्हिडने सामन्याचा रंगच बदलून टाकला. स्टार फलंदाज टिम डेव्हिडने ५२ चेंडूत ८३ धावा कुटल्या. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेला १६१ धावाच करता आल्या.

टिम डेव्हिडचा विक्रम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा विक्रम टिम डेव्हिडने रचला. यापूर्वी हा विक्रम सहा षटकारांचा होता. २००९ मध्ये मेलबर्नमध्ये डेव्हिड वॉर्नरने ८९ धावा करताना सहा षटकार खेचले होते. २००९ मध्ये जोहान्सबर्गमध्ये ८८ धावांच्या खेळीदरम्यान डेव्हिड हसीनेही हा आकडा गाठला होता. तर २०२३ मध्ये मिशेल मार्शने डर्बनमध्ये ७९ धावांच्या खेळीत सहा षटकार मारले आणि दोन दिवसांनी ट्रेव्हिस हेडनेही डर्बनमध्ये ९१ धावा करताना सहा षटकार मारले होते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मध्ये एका डावात सर्वाधिक षटकार (ऑस्ट्रेलियन फलंदाज):

  • टिम डेव्हिड – ८३ (५२ चेंडू, ४ चौकार, ८ षटकार) – डार्विन, १० ऑगस्ट २०२५
  • डेव्हिड वॉर्नर – ८९ (४३ चेंडू, ७ चौकार, ६ षटकार) – मेलबर्न, ११ जानेवारी २००९
  • डेव्हिड हसी – ८८* (४४ चेंडू, ५ चौकार, ६ षटकार) – जोहान्सबर्ग, २७ मार्च २००९
  • मिशेल मार्श – ७९* (३९ चेंडू, ८ चौकार, ६ षटकार) – डर्बन, १ सप्टेंबर २०२३

टिम डेव्हिडने एकहाती सामना फिरवला

टिम डेव्हिडने ऑस्ट्रेलियाच्या डावात एकहाती सामना फिरवला. ६ बाद ७५ या संघाच्या खराब सुरुवातीनंतर त्याने बेन द्वारशुइस (१७ धावा) सोबत सातव्या विकेटसाठी ५९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाला २० षटकांत १७८ धावांपर्यंत पोहोचवले. डेव्हिडचा अलीकडील फॉर्म उत्कृष्ट आहे. गेल्या महिन्यातच त्याने ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद टी२० शतकाचा विक्रम केला आणि जोश इंग्लिसचा ४३ चेंडूंचा विक्रम मोडला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने फक्त ३७ चेंडूत नाबाद १०२ धावा केल्या. त्यात ११ षटकारांचा समावेश होता.

टॅग्स :आॅस्ट्रेलियाद. आफ्रिकाटी-20 क्रिकेट