AUS vs IND : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानात रंगला आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी कोलमडल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहली पुन्हा एकदा बाहेर जाणाऱ्या चेंडूवर आपली विकेट गमावली. पहिल्या चेंडूवर कॅच सुटल्यावर त्याने संयमी खेळ दाखवला. पण १७ धावांवरच तो अडखळला. या इनिंगसह एक लाजिरवाणा विक्रम त्याच्या नावे झाला आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
पुन्हा पुन्हा तीच चूक, पहिल्या बॉलवर जीवनदानही मिळाल, पण पुन्हा तसाच फसला
सिडनी कसोटी सामनयात विराट कोहलीनं मैदानात उतरल्या उतरल्या पहिल्या चेंडूवरच बाहेरच्या जाणाऱ्या चेंडूवर फसला होता. बोलँडच्या गोलंदाजीवर स्मिथनं कॅचही टिपला. पण कॅच घेताना चेंडू जमीनीला स्पर्श झाला अन् कोहलीला एक जीवनदान मिळाले. याचा फायदा उठवण्यासाठी कोहलीनं मैदानात तग धरला, पण शेवटी तो बोलँडच्या गोलंजाजीवर पदार्पणाच्या सामना खेळणाऱ्या बो वेब्स्टरकडे झेल देऊन माघारी फिरला.
कोहलीच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड; कसोटी कारकिर्दीतील १२३ सामन्यात पहिल्यांदाच असं घडलं
विराट कोहलीनं ६९ चेंडूचा सामना करताना १७ धावा केल्या. विशेष म्हणजे या इनिंगमध्ये त्याच्या भात्यातून एकही बाउंड्री आली नाही. एवढ्या चेंडूंचा सामना केल्यावर एकही चौकार किंवा षटकार न मारता तंबूत परतण्याची नामुष्की त्याच्यावर ओढावली. याआधी २०२१ मध्ये चेन्नईच्या मैदानातील इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात ४८ चेंडूचा सामना करूनही कोहलीच्या भात्यातून बाउंड्री आली नव्हती. यावेळी यापेक्षा अधिक चेंडू खेळूनही तो चौकार किंवा षटकार न मारता आउट झाला.