भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना अॅडिलेडच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ नेट्समध्ये कसून सराव करताना दिसते. एका बाजूला भारतीय संघात स्टार खेळाडू दुखापतीतून सावरुन परतण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे बॅकफूटवर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या ताफ्यात दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. नेट्समध्ये प्रॅक्टिस करताना हाताच्या अंगठ्यावर चेंडू लागल्यानंतर स्टार बॅटरनं सराव सोडून बाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे हा खेळाडू डे नाईट कसोटीतून आउट होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील या स्टार खेळाडूला दुखापत
ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील दुखापतीनं त्रस्त दिसलेला हा खेळाडू दुसरा कोणी नसून तो आहे स्टीव्हन स्मिथ. पर्थच्या कसोटीत मोठ्या पराभवातून सावरुन मालिकेत बरोबरी साधण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ कसून सराव करत आहे. स्मिथला नेट्समध्ये सराव करताना चेंडू हाताच्या अंगठ्यावर लागला. त्यामुळे त्याने सराव बंद करून थेट बाहेरचा रस्ता धरला. त्याची ही दुखापत किती गंभीर आहे, यासंदर्भात कोणतेही अपडेट्स समोर आलेले नाहीत. पण जर तो पिंक बॉल कसोटीतून आउट झाला तर ऑस्ट्रेलियन संघासाठी तो मोठा धक्काच असेल.
शुबमन गिलवर आली होती पहिल्या कसोटीला मुकण्याची वेळ
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच सामन्याआधी भारतीय संघातील स्टार बॅटर शुबमन गिल दुखापतग्रस्त झाला होता. सराव करत असताना फिल्डिंग वेळी त्याच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो आता सावरला आहे. ऑस्ट्रेलियन प्राइम मिनिस्टर इलेव्हन संघाविरुद्ध अर्धशतकी खेळी करत त्याने दमदार कमबॅक करण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत. एका बाजूला भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला असताना ऑस्ट्रेलियन ताफ्यात टेन्शनचं वातावरण निर्माण झाल्याचे दिसते.
हुकमी एक्का ठरतो स्मिथ
स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियन संघातील हुकमी एक्काच आहे. २०१० मध्ये कसोटीत पदार्पण करणाऱ्या या ऑस्ट्रेलियन स्टार क्रिकेटनंर आतापर्यंतच्या १०९ सामन्यात ९ हजार ६८५ धावा केल्या आहेत. भारतीय संघाविरुद्धही त्याचा रेकॉर्ड उत्तम आहे. टीम इंडियाविरुद्ध १८ कसोटी सामन्यात त्याच्या खात्यात ६५ च्या सरासरीनं १८८७ धावा जमा आहेत. त्यामुळेच पिंक बॉल कसोटी सामन्याला तो मुकला तर ऑस्ट्रेलियन संघासाठी हा मोठा धक्का ठरेल.