Rohit Sharma Dropped Or Take Rest? Jasprit Bumrah Revealed Secret ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानात रंगला आहे. नियमित कॅप्टन रोहितच्या अनुपस्थितीत मालिकेची सुरुवात केल्यावर टीम इंडिया बुमराहच्या नेतृत्वाखालीच मालिकेची सांगता करण्यासाठी मैदानात उतरली. रोहित शर्माला शेवटच्या सामन्यातून वगळले की, त्याने स्वत: विश्रांती घेतली? हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
कॅप्टन प्लेइंग इलेव्हनमधील फिक्स चेहरा; पण टीम इंडियानं बदलला कॅप्टन्सीचा मोहरा
कोणताही संघ ज्यावेळी कॅप्टनची निवड करतो त्यावेळी तो खेळाडू प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार हे निश्चित असते. ही गोष्ट रोहितनं स्वत: विश्रांती घेतल्याची पुष्टी करणारी ठरते. पण त्याचा खराब फॉर्म पाहता त्याला सक्तीची विश्रांती दिलीये अशी चर्चाही रंगू लागलीये. बुमराहनं हा मुद्दा टॉस वेळीच निकाली लावण्याचा प्रयत्न केला आहे. महत्त्वाचे म्हणजे लीडर असावा तर असा, अशा आशयाच्या शब्दांत बुमराहनं आपल्या कॅप्टनच्या निर्णयाचा अभिमान वाटतो, असे म्हटले आहे.
रोहितसंदर्भात काय म्हणाला बुमराह?
टॉस वेळी जसप्रीत बुमराह म्हणाला की, "आमच्या कॅप्टननं या सामन्यात विश्रांती घेण्याचा पर्याय निवडत लीडरशिपची दाखवून दिली आहे. त्याने घेतलेला हा निर्णय संघातील एकजुट दाखवणारा आहे. आमच्या संघात कोणीच स्वार्थी नाही. जे संघाच्या हिताच असे तोच निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो."
सिडनी कसोटीत भारतीय संघ दोन बदलासह उतरला मैदानात
बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दोन बदलासह सिडनी कसोटीसाठी मैदानात उतरला आहे. रोहित शर्माच्या जागी संघात शुबमन गिलची एन्ट्री झाली आहे. याशिवाय दुखापतग्रस्त आकाशदीपच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. सिडनी कसोटी सामना जिंकून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची आशा पल्लवित ठेवण्यासाठी मैदानात उतरलाय. या सामन्यातील विजयासह मालिकेत २-२ बरोबरीसह बॉर्डर गावसकर ट्रॉफी आपल्याकडे ठेवण्यात टीम इंडिया यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे आहे. याआधीची ही द्विपक्षीय मालिका टीम इंडियाने जिंकली असल्यामुळे मालिका बरोबरीत सुटल्यास ट्रॉफी टीम इंडियाकडे कायम राहिल.
Web Title: AUS vs IND Rohit Sharma Dropped Or He Take Rest Himself In Sydney Test Jasprit Bumrah Revealed Secret
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.