IND vs AUS, Nitish Kumar Reddy removes Marnus Labuschagne : बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात मार्नस लाबुशनची बॅट तळवली. गेल्या काही सामन्यात सपशेल अपयशी ठरलेल्या मार्नस लाबुशन याने अॅडिलेड येथील ओव्हलच्या मैदानात सुरु असलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावत टीम इंडियाच्या गोलंदाजांचे खांदे पाडले होते.
मैदानात नांगर टाकून बराच वेळ थांबण्याची क्षमता असणारा गडी
मार्नस लाबुशेन मैदानात तग धरून बॅटिंग करत असल्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली होती. तो मैदानात नांगर टाकून मोठी खेळी करण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. कांगारु संघासाठी तो 'कणा'च आहे. त्याची संयमी खेळी तो मोठी खेळी करण्याच्या मूडमध्ये असल्याचे संकेत देणारी होती. पण नितीशकुमार रेड्डी आला अन् त्यानं कांगारुंचा हा 'कणा' मोडला.
यशस्वीनं टिपला सर्वोत्तम झेल
पहिल्या डावात भारतीय संघ अडचणीत असताना फलंदाजीत आपली जादू दाखवून देणाऱ्या नितीशकुमार रेड्डीनं दुसऱ्या दिवसाच्या खेळात आपल्या गोलंदाजीसह सरप्राइज दिले. सेट झालेल्या मार्नस लाबुशेन याची महत्त्वपूर्ण विकेट्स त्याने आपल्या खात्यात जमा केली. स्लिपमध्ये यशस्वी जैस्वालनं पुन्हा एकदा फिल्डिंगचा सर्वोत्तम नमुना दाखवून देत टीम इंडियाला मिळालेल्या या यशात मोलाचा वाटा उचलला.
१०९ चेंडूत केली ६४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी
पहिल्या दिवसाच्या खेळातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजाची विकेट पडल्यावर मार्नस लाबुशेन फंलदाजीला आला होता. त्याने नॅथन मॅकस्विनीच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची दमदार भागीदारी रचली. मॅकस्विनी बाद झाल्यावर लाबुशेन याने ट्रॅविस हेडच्या साथीनं ऑस्ट्रेलियाला भक्कम स्थितीत नेण्याच्या दिशेनं प्रवास सुरु केला. या जोडीनं चौथ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचली होती. नितीशकुमार रेड्डीच्या गोलंदाजीवर तो फसला अन् त्याचा खेळ खल्लास झाला त्याने १०९ चेंडूत ६४ धावा केल्या.