AUS vs IND, 3rd Test Jasprit Bumrah's Frustration Caught On Stump Mic : बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेन येथील गाबाच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरणामुळे गोलंदाजांना इथं मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसाच्या खेळात फक्त १३. २ षटकांचा खेळ झाला. या अपुऱ्या वेळेत भारतीय गोलंदाजांच्या हाती काहीच लागले नाही. त्यात आता बुमराहचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात स्टार गोलंदाज गाबाच्या खेळपट्टीवर कितीही जोर लावला तरी चेंडू स्विंग होईना, अशी तक्रार करताना दिसते. त्याचा स्टंम्प माइकमध्ये कैद झालेला आवाज रोहित शर्माचा निर्णय पुन्हा फसलाय का? असा प्रश्न निर्माण करणारा आहे.
पावसाच्या पहिल्या ब्रेकमध्ये निराशा, ब्रेकनंतर गोलंदाज लयीत दिसले, पण विकेटची पाटी कोरीच
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सामना अगदी वेळेत सुरु झाला. पण ६ व्या षटकातच रिमझिम पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. पहिल्या सत्रात ५.३ षटकानंतर खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी १९ धावा केल्या होत्या. सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला एक-दोन धक्के देण्याचा डाव फसला होता. पुन्हा खेळ झाल्यावर भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत धावांवर अंकुश लावला. पण पुन्हा १३.२ षटकानंतर खेळ थांबण्याआधी संघाला विकेट काही मिळाली नाही. जेवढा खेळ झाला तेवढ्यात विकेट न गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाला दिलासा मिळाला. पण जसप्रीत बुमराहचा व्हिडिओ समोर आल्यावर टीम इंडियाचा निर्णयच फसला की, काय? असा प्रश्न निर्माण होतोय.
गोलंदाजीवेळी बुमराहची 'बोलंदाजी' टेन्शन देणारी
जसप्रीत बुमराहचा जो व्हिडिओ समोर आलाय त्यात स्टंप माइकमध्ये त्याचा आवाज रेकॉर्ड झाल्याचे ऐकायला मिळते. यात बुमराह म्हणतोय की, "नही हो रहा स्विंग, कहीं भी कर" ( कुठेही टप्पा टाकला तरी चेंडू काही स्विंग होत नाही.) चेंडू टाकल्यावर गोलंदाजी मार्कवर जाताना स्टंप माइकमध्ये कैद झालेली बुमराहची बोलंदाजी टीम इंडियाच्या गोलंदाजांचं टेन्शन वाढवणारी आहे.
याआधी घरच्या मैदानावर फसला होता रोहितचा निर्णय
ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारतीय संघानं घरच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ४६ धावांत ऑल आउट झाला होता. या खराब कामगिरीनंतर रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय का घेतला? असा प्रश्न उपस्थितीत झाला होता. कर्णधाराने स्वत: प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खेळपट्टी ओळखण्यात चूक झाली, अशी कबुलीही दिली होती. आता गाबा कसोटीतही त्याच्याकडून नाणेफेक जिंकून मोठी चूक झालीये का? असा प्रश्न उपस्थितीत होतोय.