भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरपासून अॅडिलेडच्या मैदानात रंगणार आहे. गुलाबी चेंडूवर खेळवण्यात येणाऱ्या दिवस- रात्र कसोटी सामन्यात लोकेश राहुल कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार हा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पर्थ कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली होती. दमदार कामगिरीसह त्याने संधीचं सोनं करुन दाखवलं. रोहित शर्मा संघात परतल्यावर लोकेश राहुल डावाची सुरुवात करणार की, पुन्हा त्याला वेगळ्या क्रमांकावर खेळावे लागणार यासंदर्भातील गोष्ट गुलदस्त्यातच आहे. आता लोकेश राहुलनं सस्पेन्स वाढवला आहे.
बॅटिंग ऑर्डरसंदर्भात काय म्हणाला लोकेश राहुल?
अॅडिलेड कसोटी सामन्याआधी लोकेश राहुलनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला बॅटिंग ऑर्डरसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. यावेळी बॅटिंग ऑर्डरसंदर्भातील चर्चित मुद्दा निकाली काढण्यापेक्षा लोकेश राहुलनं यासंदर्भातील सस्पेन्स आणखी वाढवला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात कोणत्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळणार यासंदर्भात संघ व्यवस्थापनाने काही कल्पना दिली आहे का? असा प्रश्न लोकेश राहुलला विचारण्यात आला होता. या प्रश्नाच उत्तर देताना लोकेश राहुल हसत हसत म्हणाला की, होय, मला त्यासंदर्भातील मेसेज मिळाला आहे. पण ही गोष्ट कुणालाही शेअर करायची नाही, असंही सांगण्यात आलं आहे, असे लोकेश राहुल म्हणाला आहे.
तुला कोणत्या क्रमांकावर खेळायला आवडते?
लोकेश राहुलच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये स्थिरतेचा अभाव दिसून आला आहे. तो कोणत्या क्रमांकावर खेळायला येईल, ते काहीच सांगता येत नाही. पर्थ कसोटीत भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करणारा लोकेश राहुल कधी मध्य फळीत खेळायला येतो. कधी तो लोअर मिडल ऑर्डरमध्ये खेळताना दिसते. यामुद्यावरुन त्याला तुला कोणत्या क्रमांकावर खेळायला आवडते? असाही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर लोकेश राहुल म्हणाला की, मी आधीही सांगितले आहे की, कोणत्याही क्रमांकावर खेळायला मी तयार आहे. फक्त प्लइंग इलेव्हनमध्ये असावे, हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, असे तो म्हणाला.
लोकेश राहुल पुन्हा सलामीलाच खेळणार?
लोकेश राहुलनं आपल्या बॅटिंग ऑर्डरमधील सस्पेन्स वाढवला असला तरी तो दुसऱ्या कसोटी सामन्यात सलामीलाच खेळताना दिसेल, असा अंदाज आहे. अॅडिलेड कसोटी सामन्याआधी भारतीय संघाने कॅनबेराच्या मैदानात जो सराव सामना खेळला त्यावेळीही त्यानेच भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले होते. सेना देशांतील त्याचा ओपनिंगचा रेकॉर्डही चांगला आहे. त्यामुळे लोकेश राहुलसह टीम इंडियासाठी हा गेम प्लान अधिक फायद्याचा ठरू शकतो.