Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वेगवान गोलंदाजांची चर्चा होतेय, याचा आनंद : कपिल देव

युवा खेळाडू अधिक प्रमाणात समजूतदार असून त्यांच्यात मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास भरलेला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2024 21:58 IST

Open in App

 'मी कधी विचार केला नव्हता की, भारताच्या वेगवान गोलंदाजांची इतकी मोठी चर्चा होईल; पण, आज अशी चर्चा होतेय आणि याचा मला खूप आनंद आहे,' असे भारताचे पहिले विश्वविजेते कर्णधार कपिलदेव यांनी सांगितले. गोल्डन इगल अजिंक्यपद गोल्फ स्पर्धेदरम्यान रविवारी मुंबईत कपिलदेव यांनी संवाद साधला.

कपिलदेव यांनी भारतीय वेगवान गोलंदाजांचे विशेष करून जसप्रीत बुमराहचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, 'वेगवान गोलंदाजाला भारताचे नेतृत्व करताना पाहणे आनंददायी आहे. त्याने ज्या प्रकारे नेतृत्व केले ते कौतुकास्पद आहे. गोलंदाज म्हणून बुमराहविषयी फारसे बोलणार नाही; कारण त्याची कामगिरीच सर्व काही सांगत आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये सध्या खूप चांगला खेळ करत आहे आणि पहिला कसोटी सामना नक्कीच जिंकला पाहिजे. आपण सकारात्मक विचार ठेवूनच वाटचाल करायला हवी.'

ऑस्ट्रेलियात दमदार फलंदाजी केलेल्या यशस्वी जैस्वालविषयी कपिलदेव म्हणाले की, 'यशस्वी शानदार खेळला; पण मला त्याची कोणाशी तुलना करायची नाही आणि मला तुलना करायला आवडतही नाही. मला केवळ युवा खेळाडूंना चांगल्या प्रकारे खेळताना पाहायचे आहे. नवे विक्रम नेहमीच नोंदले जातील. युवा खेळाडूंसाठी महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांनी जबाबदारीसह देशाचे प्रतिनिधित्व करावे. आजचे युवा खेळाडू अधिक प्रमाणात समजूतदार असून त्यांच्यात मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास भरलेला आहे. त्यामुळे मला कोणाचीही, कोणाशीही तुलना करणे आवडणार नाही.' 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघकपिल देवजसप्रित बुमराहआॅस्ट्रेलिया