Jasprit Bumrah Akash Deep Mohammed Siraj India's pacers spark Australia Top Order Collapse : बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवर सुरु आहे. पाचव्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाचा पहिला डाव २६० धावांवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियानं १८५ धावांच्या आघाडीसह आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
अखेरच्या दिवसाच्या खेळात पावसाचा व्यत्यय आणि ऑस्ट्रेलियानं घेतलेली मोठी आघाडी पाहता हा सामना अनिर्णित राहिल, असे चित्र निर्माण झाले. पण भारतीय गोलंदाजांनी दमदार सुरुवात करत तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये नवं ट्विस्ट आणलं आहे. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत अवघ्या ३३ धावांत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ गारद केला आहे. जो सामना फक्त अन् फक्त ऑस्ट्रेलिया जिंकू शकतो अन्यथा ड्रॉ होऊ शकतो, असे वाटत असताना भारतीय संघाने आम्ही ड्रॉसाठी नाही तर जिंकण्यासाठी खेळत आहोत, याची झलक दाखवून दिलीये. फायनली या सामन्याचा निकाल काय लागणार ते पाहण्याजोगे असेल.
ऑस्ट्रेलियाच्या टॉप बॅटिंग ऑर्डरमधील पहिल्या फलंदाजांना गाठता आला नाही दुहेरी आकडा
नॅथन मॅकस्विनी आणि उस्मान ख्वाजा या जोडीनं ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या ११ धावा असताना बुमराहनं ही जोडी फोडली. उस्मान क्वाजा ८ धावांवर बोल्ड झाला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या मार्नस लाबुशेन याला बुमराहनं अवघ्या एका धावेवर तंबूत धाडले. ऑस्ट्रेलियानं १६ धावांवर दुसरी विकेट गमावली. यात एकाही धावेची भर न घालू देता टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. सलामीवीर नॅथन मॅक्सिवनी याला आकाशदीपनं ४ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. मिचेल मार्शला २ धावांवर तंबूत धाडत आकाशदीपनं आणखी एक विकेट आपल्या नावे केली. मोहम्मद सिराजनं स्टीव्ह स्मिथच्या रुपात पहिली विकेट घेतली. स्मिथ एक चौकार मारून चालता झाला.
मग मोहम्मद सिराजनं घेतली ट्रॅविस हेडची विकेट
ट्रॅविस हेड हा टीम इंडियाची डोकेदुखी ठरला आहे. मोहम्मद सिराज आणि ट्रॅविस हेड यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगलीच टशन पाहायला मिळाली होती. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातही ट्रॅविस हेडनं शतकी खेळी केली होती. पण दुसऱ्या डावात त्याला फार काळ मैदानात तग धरता आला नाही. त्याने दुहेरी आकडा गाठला. पण तो सिराजच्या गोलंदाजीवर फसला. हेडन १९ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने १७ धावांची भर घातली.