IND vs AUS, Rohit Sharma Confirmed KL Rahul Open With Yashasvi Jaiswal Adelaide Pink Ball Test : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने दुसऱ्या कसोटी सामन्या आधी मोठा तिढा सोडवला आहे. रोहित शर्माच्या कमबॅकनंतर लोकेश राहुलच ओपनिंग करणार की, त्याला पुन्हा मध्यफळीत खेळायची वेळ येणार? हा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. कॅप्टन रोहित शर्मानं लोकेश राहुल दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालसोबत भारताच्या डावाला सुरुवात करेल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा मध्यफळीतील जबाबदारी सांभाळताना दिसेल.
KL राहुलवर भरवसा; कॅप्टन रोहितनं त्याच्यासाठी सोडली ओपनिंग
दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय कर्णधाराने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला लोकेश राहुलच डावाची सुरुवात करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रोहित शर्मा म्हणाला की, "होय, केएल राहुलच दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करेल. मी मध्यफळीत फलंदाजी करेन." खरंतर पिंक बॉल टेस्टआधी भारतीय संघाने खेळलेल्या ऑस्ट्रेलियन प्राइम मिनिस्टर इेलव्हन विरुद्धच्या सराव सामन्यातच त्याचे संकेत मिळाले होते. या सामन्यात केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनीच डावाची सुरुवात केली होती. रोहित या सामन्यात चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसला होता.
नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?
पहिल्या कसोटी सामन्यात दोघांनी (यशस्वी-केएल राहुल) उत्तम फलंदाजी केली. मी घरी बसून लोकेश राहुलची बॅटिंग पाहिलीये. त्याच्या फलंदाजीचा आनंद घेतला. ते पाहिल्यावर सलामी जोडीत बदल करण्याची अजिबात गरज वाटत नाही. आम्ही रिझल्टचा विचार करतो. यश मिळत असेल त्या गोष्टीला पहिली पसंती देतो, असे म्हणत रोहित शर्मानं लोकेश राहुल सलामीची जबाबदारी पुन्हा एकदा पार पाडेल, ही गोष्ट स्पष्ट केलीये. भविष्यात यात बदल केला जाऊ शकतो, पण सध्या हीच जोडी डावाला सुरुवात करेल, असे तो म्हणाला.
पहिल्या कसोटी सामन्यात हिट ठरली होती जोडी
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलनं यशस्वीसोबत भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले होते. दुसऱ्या डावात या दोघांनी २०१ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियात कोणत्याही भारतीय जोडीनं केलेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. केएल राहुलची खेळी मनात भरल्यामुळे रोहित शर्मानं जो निर्णय घेतलाय तो अगदी योग्य आणि शहाणपणाचा आहे. ज्यातून कॅप्टनच्या मनाचा मोठेपणाही दिसून येतोय. कारण रोहित शर्मानं ओपनिंगची आपली जागा लोकेश राहुलसाठी अगदी सहज सोडलीये.