भारतीय संघ पर्थच्या मैदानातून ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. २२ नोव्हेंबरपासून या बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. पहिल्या पर्थ कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दुसऱ्यांदा तो कसोटी सामन्यात भारतीय संघाची कॅप्टन्सी करताना दिसेल. या मेगा लढतीआधी बुमराहनं पत्रकारांसमोर 'बोलंदाजी' केली. पर्थ कसोटी सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत कार्यवाहू कॅप्टन बुमराह याने सहकारी मोहम्मद शमीसंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे.
मोहम्मद शमीचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात समावेश होणार का?
पर्थ कसोटीआधीच्या पत्रकार परिषदेत जसप्रीत बुमराह याने मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळताना दिसू शकतो, असे म्हटले आहे. मोहम्मद शमीनं अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना हा वनडे वर्ल्ड कपच्या फायनलच्या रुपात खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो संघाबाहेर पडला आहे. शमीनं रणजी करंडक स्पर्धेतून दमदार कमबॅक केल्यावर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिसणार का? हा मुद्दा चर्चेत आला होता. यावर आता जसप्रीत बुमराहनं आपलं मत व्यक्त केले आहे.
शमी संदर्भात नेमकं काय म्हणाला बुमराह?
प्रेस कॉन्फरन्समध्ये जसप्रीत बुमराह याला सहकारी मोहम्मद शमीसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. यावर टीम इंडियाचा कार्यवाहू कॅप्टन म्हणाला की, "शमी भाईनं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. तो या संघाचा (टीम इंडिया) प्रमुख खेळाडू आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे. सर्व गोष्टी ठीक असतील तर तुम्ही त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही पाहू शकता."
दुसऱ्या सामन्याआधी रोहितसह शमीही टीम इंडियाच्या ताफ्यात मारू शकतो एन्ट्री
भारतीय संघ पर्थच्या मैदानातून ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्याला सुरुवात करणार आहे. या सामन्यात रोहितही संघाचा भाग नाही. तो दुसऱ्या सामन्यासाठी संघाला जॉईन होईल, असे बोलले जाते. एवढेच नाही तर आता शमीही त्याच्यासोबत टीम इंडियाला जॉईन होईल, असा दावाही काही रिपोर्टसमधून करण्यात येत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना अॅडलेडच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. मालिकेला सुरुवात होण्याआधी कार्यवाहू कॅप्टन जसप्रीत बुमराह यानं शमीसंदर्भात सकारात्मक अपडेट्स दिल्याचे दिसते.