IND vs AUS 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना १४ डिसेंबरला ब्रिस्बेन येथील गाबाच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. अॅडिलेड कसोटी सामना गमावल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टीम इंडियापुढे आता मोठे चॅलेंज निर्माण झाले आहे. कारण बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत उर्वरित तिन्ही सामने भारतीय संघाला जिंकावे लागणार आहेत. त्यात तिसऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडिया अन् भारतीय चाहत्यांचे टेन्शन वाढवणारी गोष्ट समोर येत आहे. जसप्रीत बुमराह प्रॅक्टिस सेशनपासून दूर राहिल्याचे दिसते. या दुराव्याचं कारण दुखापत तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झालाय.
जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार?
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघानं सरावाला सुरुवात केलीये. पण सराव सत्रात उप कर्णधार जसप्रीत बुमराह सहभागीच झाला नाही. अॅडिलेडच्या मैदानात जसप्रीत बुमराह दुखापतीनं त्रस्त झाल्याचे दिसून आले होते. मैदानात फिजिओची झालेली एन्ट्री अन् त्यानंतर स्टार गोलंदाजाने केलेली सामान्य दर्जाची गोलंदाजी पाहून अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. तो तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात आता बुमराह सरावासाठी मैदानात न उतरल्यामुळे त्याची दुखापत गंभीर तर नाही ना? हा प्रश्न चर्चेत येतोय. बीसीसीआयने यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.
हे देखील असू शकतं तो सरावापासून दूर राहण्यामागंच कारण
जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा कणा आहे. भारतीय संघ त्याच्याशिवाय मैदानात उतरण्याचा विचारही करू शकत नाही. अॅ़डिलेड कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह किरकोळ दुखापतीनं त्रस्त दिसला होता. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावात गोलंदाजीही केली. त्यामुळे जसप्रीत बुमराहची ती दुखापत फार गंभीर नसावी, असे चित्रही पाहायला मिळाले आहे. आता मग पुन्हा प्रश्न उरतो तो हाच की, मग त्याने प्रॅक्टिस सेशन वगळण्यामागचं कारण काय? वर्कलोड मॅनेजमेंटचा एक भाग म्हणूनही संघ व्यवस्थापनानं त्याला सराव सत्रापासून दूर ठेवलेले असू शकते.
बुमराह लयच खास, कारण तोच टीम इंडियाच्या विजयाची मोठी आस
पर्थ कसोटी सामन्यात बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दिमाखदार विजय नोंदवला होता. बुमराहनं जबरदस्त गोलंदाजी करत कांगारूंना अडचणीत आणले होते. पिंक बॉल टेस्टमध्येही बुमराहनं चार विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. पण या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तिसरा सामना जिंकून मालिकेत पुन्हा आघाडी मिळवून देण्यात जसप्रीत बुमराहवर मोठी जबाबदारी असेल, त्यामळेच तो पुन्हा मैदानावर दिसावा हीच टीम इंडियासह चाहत्यांचीही इच्छा आहे.