Washington Sundar play MCG test against Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी अंतर्गत चौथा कसोटी सामना हा मेलबर्नच्या मैदानात रंगणार आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघानं एक दिवस आधीच आपली प्लेइंग इलेव्हन ठरवली आहे. त्यानंतर भारतीय संघ या सामन्यात कोणत्या रणनितीसह मैदानात उतरणार याची चर्चा रंगू लागली आहे. कॅप्टन रोहित शर्मा चौथ्या आणि महत्त्वपूर्ण कसोटी सामन्यासाठी संघात एक महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारी असल्याचे संकेत मिळतात. पहिल्या तीन सामन्यात जो गडी टीम इंडियासाठी तारणहार ठरला त्यालाच बाकावर बसण्याचा प्लान शिजल्याची चर्चा आहे.
ज्यानं लक्षवेधी कामगिरी करून दाखवली त्याला रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. मेलबर्नचं मैदान मारून मालिकेत आघाडी घेत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिप फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल पाहायला मिळू शकतात. वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळू शकते, याचे संकेत खुद्द रोहित शर्मानं दिले आहेत. नितीश कुमार रेड्डीच्या जागी त्याची संघात वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. हा प्रयोग म्हणजे ऑस्ट्रेलियात मैदान गाजवणाऱ्या खेळाडूला रोहित बाकावर बसवण्याच्या तयारीत असल्याचा सीन क्रिएट करणारा आहे.
वॉशिंग्टन सुंदरची होणार प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मेलबर्न कसोटी सामन्यात भारतीय संघ दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. नितीश कुमार रेड्डीच्या जागी वॉशिंग्टन सुंदरची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री पक्की मानली जात आहे. नितीश रेड्डीनं बॅटिंगमध्ये धमक दाखवली आहे. पण गोलंदाजीत त्याला फारशी चमक दाखवता आलेली नाही. त्यामुळे बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी तो बाकावर बसल्याचे दिसू शकते. वॉशिंग्टन सुंदर या मालिकेतील पर्थ कसोटीत मैदानात उतरला होता. त्यानंतर पुढच्या दोन्ही सामन्यात त्याला बाकावर बसावे लागले होते.
दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरणार टीम इंडिया?
मेलबर्न पिच क्युरेटरनुसार, MCG खेळपट्टी जलदगती गोलंदाजांसाठी अनुकूल असेल. पण मेलबर्नमधील उन्हाचा तडाका पाहता खेळपट्टीचा रंग बदलू शकतो. खेळपट्टीवर भेगा पडणे आणि ती संथ होणं या गोष्टी घडू शकतात. ही परिस्थितीत फिरकीपटूंसाठी फायद्याची ठरु शकते. त्यामुळेच रवींद्र जडेजासह वॉशिंग्टनच्या रुपात अतिरिक्त गोलंदाज खेळवण्याचा विचार रोहित आणि टीम मॅनेजमेंट करत आहे. नाणेफेकीवेळी नेमका काय निर्णय घेतला जाणार? तो टीम इंडियासाठी फायद्याचा ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.