Team India unwanted recod, Aus vs Ind 4th Test: बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १८४ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथच्या शतकाच्या जोरावर ४७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने नितीश कुमार रेड्डीच्या शतकामुळे ३६९ धावांचा पल्ला गाठला. तिसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया २३४ धावांत ऑलाऊट झाली. अखेर ३४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १५५ धावांत आटोपला. भारताच्या या पराभवासोबतच कसोटी क्रिकेटमध्ये तब्बस ४९व्यांदा एक प्रकार घडल्याचे दिसून आले.
मेलबर्न कसोटीचा निकाल टीम इंडियाच्या बाजूने लागला नाही. ऑस्ट्रेलियाने हा सामना १८४ धावांनी जिंकला. या मोठ्या विजयासह त्यांनी मालिकेतही २-१ अशी आघाडी घेतली. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यात टीम इंडियाचा दुसरा डाव केवळ १५५ धावांवरच संपुष्टात आला. ३०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागण्याची ही कसोटी क्रिकेटमधील तब्बल ४९वी वेळ ठरली.
भारतीय फलंदाजीने पाचव्या दिवशी ३४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपुढे गुडघे टेकले. कर्णधार रोहित शर्मा (९), केएल राहुल (०), विराट कोहली (५), रविंद्र जाडेजा (२), नितीश कुमार रेड्डी (१) हे सर्व फलंदाज साधी दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. यशस्वी जैस्वालने सलामीला आल्यापासून संघाची एक बाजू लावून धरली. त्याने २०८ चेंडूंचा सामना करत ८४ धावांची अत्यंत झुंजार खेळी केली. पण त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. रिषभ पंतने काही काळ संघर्ष केला. १०४ चेंडू खेळल्यानंतर तो देखील ३० धावांवर माघारी परतला. अखेर आकाश दीप (७), जसप्रीत बुमराह (०) आणि मोहम्मद सिराज (०) या तळाच्या फलंदाजांना झटपट गुंडाळून ऑस्ट्रेलियाने मोठा विजय मिळवला.