सिडनी कसोटी सामन्यात विराट कोहलीकडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा होत्या. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील एका शतकाशिवाय तो मोठी धावसंख्या करण्यात सातत्यपूर्ण अपयशी ठरताना दिसली. पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालच्या रुपात टीम इंडियाने दुसरी विकेट्स गमाल्यावर किंग कोहली मैदानात आला. पहिल्याच चेंडूवर त्याला जीवनदान मिळाले. पण या संधीच सोनं करण्यात तो कमी पडला. पुन्हा बाहेर जाणाऱ्या चेंडू खेळण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. ६९ चेंडूचा सामना करताना एकही चौकार न मारता १७ धावा करून तो तंबूत परतला.
पहिल्याच चेंडूवर स्मिथ टिपला होता कॅच, पण...
भारतीय संघाच्या डावातील आठव्या षटकात स्कॉट बोलँड गोलंदाजी करत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर पहिल्याच चेंडूवर बॅटची कड घेऊन चेंडू स्लिपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथकडे गेला. स्मिथनं अप्रतिम प्रयत्न करत चेंडू झेलला. पण थर्ड अंपायरनं रिप्ले पाहिल्यावर चेंडू नकळत जमीनीला स्पर्श झाल्याचे दिसल्यामुळे विराट कोहलीला नॉट आउट ठरवलं.
स्टँडमध्ये अनुष्काच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुललं अन् फिल्डवर स्मिथनं नाक मुरडलं
थर्ड अंपायरच्या निर्णयानंतर भारतीय चाहत्यांच्या जीवात जीव आला. दुसरीकडे स्टँडमध्ये सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थितीत असलेल्या अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावरही हास्य फुलल्याचे पाहायला मिळाले. पण स्मिथ मात्र या निर्णयावर नाराज दिसला. त्याने फिल्डवर नाक मुरडलं. या सीननंतर किंग कोहली चांगलाच लयीत खेळताना दिसला. किंग कोहलीचा परफेक्ट डिफेन्स अन् त्यावर अनुष्का शर्माची खास रिअॅक्शन पाहायला मिळाली.
पाच सामन्यांच्या मालिकेत ८ पैकी ७ डावात बाहेरचा चेंडू खेळण्याच्या नादात फसला कोहली
विराट कोहली यावेळी पुन्हा एकदा मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत होते. पण जवळपास दहा षटके मैदानात सेट झाल्यावर त्याने पुन्हा तिच चूक केली. भारताच्या डावातील ३२ व्या षटकात बोलँड गोलंदाजी करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कोहलीनं बाहेर जाणारा चेंडू खेळला अन् पुन्हा तो जुन्या पॅटर्नमध्येच बाद झाला. ऑस्ट्रेलियन मैदानात खेळताना ३० पैकी २८ वेळा कोहली झेलबाद झाला आहे. त्यात त्याने बाहेरच्या चेंडूवर अनेकदा विकेट्स गमावल्याचे पाहायला मिळाले आहे. यंदाच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत ८ पैकी सातव्यांदा तो बाहेर जाणारा चेंडूवर फसल्याचे दिसून आले.