बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरला असला तरी १० खेळाडू काहीतरी करण्याच्या इराद्याने उतरेल अन् रोहित शर्मा फक्त कॅप्टन असल्यामुळे संघात खेळतोय, असा सीन दिसतोय. आधीच्या दोन कसोटी सामन्यात सहाव्या क्रमाकांवर फ्लॉप शो दिल्यावर मेलबर्नच्या बॉक्सिंग डे कसोटीत ओपनिंगलाही त्याने आणखी एक फ्लॉप शो दिला. ना बॅटिंग धड जमतीये ना कॅप्टन्सी असं म्हणण्याची वेळ रोहितवर आलीये. मॅच आधी शुबमन गिलला बाहेर बसवण्याचा निर्णय अन् आता ओपनिंगला आल्यावर जो चेंडू सोडण्याची गरज होती तिथं फेव्हरेट पुल शॉट खेळण्याच्या मोह अनावर झाल्यामुळे रोहित शर्माच्या खेळण्यात काहीच अर्थ उरलेला नाही तेच दिसून येते. हिटमॅनचा फ्लॉप शो तो निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे, असेच चित्र निर्माण करतोय.
रोहित शर्मा एक ओव्हरही नाही खेळला, ३ धावा करून टीम इंडियाच्या अडचणी वाढवून गेला
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत केएल राहुल याने डावाची सुरुवात करताना चांगली कामगिरी करून दाखवली. तरीही रोहित शर्मानं ओपनिंगला येण्याचा निर्णय घेतला. पण त्याला एकही ओव्हर मैदानात तग धरता आला नाही. भारतीय संघाच्या पहिल्या डावातील दुसऱ्याच षटकातील पॅट कमिन्सच्या शेवटच्या चेंडूवर पुल शॉट खेळण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् ५ चेंडूत अवघ्या ३ धावा काढून बोलँडकडे कॅच देऊन तो तंबूत परतला. त्याने खेळलेला शॉट पाहून तो ओपनिंगला आलेला की, ऑस्ट्रेलियन फिल्डरला कॅचिंगच प्रॅक्सिस द्यायला आलेला असा प्रश्न पडतो.
रोहितचा फ्लॉप शो; ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ डावात फक्त २२ धावा
रोहित शर्मा सातत्याने अपयशी ठरताना दिसतोय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिल्या कसोटी सामन्याला मुकल्यावर अॅडिलेड कसोटी सामन्यातून त्याने टीम इंडियात एन्ट्री मारली. पण या सामन्यातील दोन्ही डावात त्याला दुहेरी आकडा गाठता आला नव्हता. पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ६ धावा करून तो तंबूत परतला. ब्रिस्बेन कसोटी सामन्यातील डावात फक्त दुहेरी आकडा गाठून १० धावांवर तो बाद झाल्याचे पाहायला मिळाले. आता मेलबर्न कसोटीत पुन्हा तो दुहेरी आकडा गाठू शकलेला नाही.
ऑस्ट्रेलियानं पहिल्या धावात उभारलीये मोठी धावसंख्या
मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी तगडी बॅटिंग केली. युवा म कॉन्स्टास ६०(६५), उस्मान ख्वाजा ५७ (१२१), आणि मार्नस लाबुशेन ७२(१४५) यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीनंतर स्मिथच्या १४०(१९७) भात्यातून दमदार शतक आले. एवढेच नाही तर पॅट कमिन्सनंही ४९ धावांचे योगदा दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघानं पहिल्या डावात ४७४ धावा केल्या आहेत. या धावांचा पाठलाग करातना भारतीय संघाकडून दमदार ओपनिंगची गरज असताना रोहित फ्लॉप ठरलाय.