Join us

AUS vs IND : Steven Smith ची टीम इंडियाविरुद्ध विक्रमी सेंच्युरी!

टीम इंडियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील त्याचे हे सलग दुसरे शतक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 06:27 IST

Open in App

मेलबर्न बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथनं कसोटी कारकिर्दीतील ३४ वे शतक झळकावले. या शतकासह त्याने जो रुटला मागे टाकत भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम आपल्या नावे केला आहे. भारताविरुद्ध स्मिथच्या भात्यातून कसोटी सामन्यात निघालेले हे ११ वे आणि विक्रमी शतक आहे. यातील ३ शतके त्याने भारतीय मैदानात केली आहेत. टीम इंडियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील त्याचे हे सलग दुसरे शतक आहे. दुसऱ्या सामन्यातही त्याच्या भात्यातून शतकी खेळी पाहायला मिळाली होती. 

घरच्या मैदानात टीम इंडियाविरुद्ध पहिल्या डावात सातवी सेंच्युरी

भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक ११ शतके झळकावणाऱ्या स्मिथनं घरच्या मैदानात खेळताना सातव्यांदा पहिल्या डावात सेंच्युरी ठोकली आहे. याआधी रेड बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडिया विरुद्ध घरच्या मैदानात खेळताना त्याने पहिल्या डावात, १६२*, १३३, १९२, ११७, १३१, १०१ अशी कामगिरी नोंदवली होती. त्यात आता आणखी एका शतकाची भर पडली आहे. दोन वेळा त्याच्या पदरी भोपळाही आला आहे. 

कसोटीत टीम इंडियाविरुद्ध सर्वाधिक शतक झळकवणारे फलंदाज

  • स्टीव्ह स्मिथ ११
  • जो रुट १०
  • सर गॅरी सोबर्स ८
  • सर विव्हियन रिचर्ड्स ८
  • रिकी पॉन्टिंग ८

स्मिथचं शतक वेगवेगळ्या कारणांनी ठरतं खास

स्मिथने ४३ व्या डावात भारताविरुद्ध ११ वे कसोटी शतक साजरे केले.  रुटनं ५५ डावात टीम इंडियाविरुद्ध १० कसोटी शतके ठोकली आहेत. सर गारफिल्ड सोबर्स, सर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि रिकी पाँटिंग प्रत्येकी आठ शतकांसह यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) स्मिथचे हे पाचवे शतक आहे आणि आता सर ॲलन बॉर्डर, बिल लॉरी, रिकी पॉन्टिंग आणि ग्रेग चॅपेल यांच्यापेक्षा त्यानं इथं सर्वाधिक शतकांचा विक्रमही आपल्या नावे केला. बॉर्डर, लॉरी, पाँटिंग आणि चॅपल यांनी  MCG वर प्रत्येकी चार-चार शतके झळकावले आहेत. ३४ व्या कसोटी शतकासह स्मिथनं केन विल्यमसनलाही ओव्हरटेक केले. 

टॅग्स :स्टीव्हन स्मिथआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ