KL Rahul Wicket Controversy : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानात सुरु आहे. बहुप्रतिक्षित द्विपक्षीय मालिकेतील पहिल्याच सामन्यातील पहिल्या दिवशी केएल राहुलच्या विकेटमुळे वादाची ठिणगी पडलीये. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली.
संयमी खेळीसह त्याने आपल्या बॅटिंगमधील नजाकत दाखवूही दिली. एका बाजूला विकेट्स पडत असताना दुसऱ्या बाजूला तो अगदी आरामात खेळत होता. पण गडबड झालीच. त्याची विकेट पडली अन् वादाची ठिणगी पडून नवा वाद पेटल्याचा सीन निर्माण झाला. लोकेश राहुल ७४ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने २६ धावा करून माघारी फिरला.
KL राहुलसोबत चिटिंग?
केएल राहुल ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा अगदी उत्तमरित्या सामना करत होता. भारतीय संघाच्या डावातील २३ व्या षटकात ऑसी कर्णधार पॅट कमिन्स याने मिचेल स्टार्कच्या हाती चेंडू सोपवला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर लोकेश राहुल डिफेन्स करायला गेला अन् चुकला. हा चेंडू यष्टिरक्षक कॅरीच्या हाती गेल्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी झेलबादची जोरदार अपील केली. मैदानातील पंचांंनी ही अपील फेटाळून लावली. मैदानातील पंचांच्या या निर्णयाला पॅट कमिन्सन चॅलेंज दिलं. त्याने रिव्ह्यू घेतला आणि तो यशस्वीही ठरला. तिसऱ्या पंचांनी (टेलिव्हिजन अंपायर) लोकेश राहुलला बाद ठरवले. या निर्णायावरुन चांगलाच वाद पेटला आहे. सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियात लोकेश राहुलसोबत चिटिंग झाली, अशी चर्चा रंगू लागली आहे.
नेमकं काय घडलं? कोणत्या कारणामुळे लोकेश राहुलची विकेट्स ठरतीये वादग्रस्त?
रिव्ह्यूनंतर रिप्ले दाखवण्यात आला त्यावेळी बॅक कॅमेरा अँगलनं बॅट आणि चेंडू यात अंतर असल्याचे दिसून येत होते. फ्रँट कॅमेरा अँगलमध्ये स्नीको मीटरनं आवाज कॅच केला. पण यावेळी बॅट आणि पॅडचा संपर्क झाल्याचेही दिसून येत होते. पॅडसह चेंडूही बॅटला स्पर्श झाला असेल तर स्नीकोमध्ये दोन वेळा ते दिसायला हवे होते. पण तसे झाले नाही. एका स्नीको सिग्नलवरच तिसऱ्या पंचांनी निर्णय फिरवला अन् लोकेश राहुलला बाद ठरवले. ठोस पुरावा नसल्यामुळे हा निर्णय लोकेश राहुलच्या बाजूनेच लागायला हवा होता, असा सूर सोशल मीडियावर उमटताना दिसतोय.
KL राहुलशिवाय कॉमेंट्री पॅनलमधील मंडळीही हैराण
आउट दिल्यावर लोकेश राहुलनं नाराजी व्यक्त केलीच. पण त्याच्याशिवाय कॉमेंट्री करणाऱ्या मंडळींचा सूरही नाराजीचा होता. संजय मांजरेकर म्हणाला की, थर्ड अंपायरनं सर्व अँगल व्यवस्थितीत पाहायला हवे होते. दुसरीकडे वासीम अक्रम म्हणाला की, स्नीकोमध्ये जो सिग्नल कॅच झाला तो बॅट पॅडचा आहे, चेंडू स्पर्श झाल्याचा तो आवाज नव्हता, असे वाटते, असे मत पाक दिग्गजाने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियन मॅथ्यू हेडन यानेही स्नीकोतील सिग्नल हा बॅट-पॅडचा आवाज कॅच करणारा होता, असे म्हटले आहे.