Jasprit Bumrah AUS vs IND Day 1: जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यामुळं पर्थ कसोटीतील पहिल्या दिवसाच्या खेळातील दोन सत्र गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या सत्रात बॅकफूटवर ढकलला गेला आहे. अखेरच्या एका सत्रात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचे कंबरडे मोडत सामन्यात दमदार कमबॅक करून दाखवले. जसप्रीत बुमराहनं ४ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या बाजूला त्याला मोहम्मद सिराज याने २ आणि हर्षित राणा एक विकेट घेत आपल्या कॅप्टनला उत्तम साथ दिली.
परिणामी पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियन संघाने ६७ धावांत ७ विकेट्स गमावल्या. भारतीय संघाने पहिल्या डावात १५० धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघ ८३ धावांनी पुढे असून दुसऱ्या दिवशी उर्वरित ३ विकेट्स घेत टीम इंडियाला पर्थ कसोटीत अल्प आघाडीसह सामन्यातील पकड मजबूत करण्याची संधी आहे.
दोन सत्रात ऑस्ट्रेलियाचा जलवा, भारतीय संघाचा डाव १५० धावांत आटोपला
पर्थ कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दोन सत्रातच भारतीय संघ ऑल आउट झाला. रिषभ पंत ३७ (७८) आणि नितीश कुमार रेड्डी ४१ (५९) या दोघांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारतीय संघाला १५० धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाने पहिल्या डावात धावफलकावर उभारलेली धावसंख्या खूपच कमी आहे. टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत, असे चित्र निर्माण झाले होते. पण भारतीय गोलंदाजांनी खास करून बुमराहच्या भेदक माऱ्याने हे चित्रच पालटले.
भारतीय गोलंदाजीसमोर कांगारू संघातील फलंदाज ठरले हतबल
भारतीय संघाची अल्प धावसंख्या पाहिल्यावर ऑस्ट्रेलियन संघ सामन्यात आणखी मजबूत पकड घेईल, असे वाटत होते. पण जसप्रीत बुमराहनं एका मागून एक धक्के देत ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजीला सुरुंग लावला. त्याला मोहम्मद शमीनं दोन विकेट्स घेत उत्तम साथ दिली. हर्षित राणानं धोकादायक ठरू शकेल अशा ट्रॅविस हेडला चालते केले. परिणामी कांगारूंची अवस्थाच बिकट झाली. दिवसाअखेर ऑस्ट्रेलियन संघाने ६७ धावांच्या मोबदल्यात ७ विकेट्स गमावल्या होत्या. विकेट किपर बॅटर कॅरी १९ (२८) आणि मिचेल स्टार्क ६ (१४) धावांवर खेळत होते. सलामीवीर नॅथन मॅक्सवीनी १० धावा, ट्रॅविस हेडच्या ११ धावा वगळता ऑस्ट्रेलियाच्या संघातील अन्य कोणत्याच खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
अल्प धावसंख्या करूनही भारतीय संघाला आघाडी घेण्याची संधी
भारतीय संघ दुसऱ्या दिवसाच्या खेळात किती धावांत ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित विकेट्स घेणार? भारतीय संघाला किती धावांची आघाडी मिळणार? ते पाहण्याजोगे असेल. टीम इंडियाने कांगारूंना शंभरीच्या आत गुंडाळण्यात यशस्वी ठरली, तर भारतीय संघासाठी पर्थचं मैदान मारण्याची एक मोठी संधी निर्माण होईल.