Atul Wassan Angry On Shama Mohamed : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नियोजित २ सामन्यांच्या अनौपचारिक कसोटी मालिकेसाठी भारतीय 'अ' संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघात सरफराज खानची निवड न झाल्याचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सरफराज खान याने मागील पाच वर्षांत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११०.४७ च्या सरासरीसह धावा करताना १० शतके आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत. एवढी दमदार कामगिरी करूनही त्याची भारतीय 'अ' संघात निवड का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या मुद्यावर काँग्रेसच्या नेत्या डॉ. शमा मोहम्मद यांनी केलेल्या पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हा मुद्दा धर्माशी जोडल्यामुळे माजी क्रिकेटर भडकला
डॉ. शमा मोहम्मद यांनी सरफराजची निवड न होण्याचा मुद्दा थेट धर्माशी जोडला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. त्यानंतर यावर भारताचे माजी क्रिकेटर अतुल वासन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय घडलं? शमा मोहम्मद यांनी सरफराज खानसंदर्भात काय पोस्ट केली? त्यावर माजी क्रिकेटर अतुल वासन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घेऊयात सविस्तर
जो जीव तोडून मेहनत घेतोय त्याला BCCI नं येड्यात काढलं? मुंबईकरासाठी बड्या राजकीय नेत्याची बॅटिंग
शमा मोहम्मद यांची वादग्रस्त पोस्ट
डॉ. शमा मोहम्मद यांनी एक्स अकाउंटवरुन पोस्ट शेअर करताना लिहिलंय की, सरफराज खानची निवड त्याच्या आडनावामुळे झाली नाही का? हे फक्त विचारत आहे. गौतम गंभीर या मुद्द्यावर कोणत्या विचाराचे आहेत ते आपल्या सर्वांना ठावूकच आहे, असा उल्लेखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
माजी क्रिकेटरनं खोडून काढला धर्माचा मुद्दा
भारताचे माजी क्रिकेटपटून अतुल वासन यांनी शमा मोहम्मद यांचा आरोप बिनबुडाचा असल्याचे म्हटले आहे. खेळात धर्माचं कार्ड खेळणं अयोग्य आहे. सरफराज खान हा संघात स्थान मिळवण्याचा हकदार आहे. त्याला पुरेशी संधी मिळालेली नाही. हे मान्य करत ते म्हणाले की, हा मुद्दा धर्माशी जोडणं बरोबर नाही. भारतीय क्रिकेटमध्ये असं कधीच घडलं नाही. अझरुद्दिनच्या काळापासून अशा गोष्टी बोलल्या गेल्या. पण त्यात काहीच सत्य नाही.