Asian Games 2023 PAK vs AFG : भारतीय संघाने आशियाई स्पर्धा २०२३ च्या पुरुष क्रिकेट स्पर्धेच्या फायनल स्पर्धेत प्रवेश करून सुवर्णपदकासाठी दावा सांगितला आहे. तेच दुसरीकडे अफगाणिस्तानने दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा फडशा पाडला. अफगाणिस्तानने ४ विकेट्स राखून सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ १८ षटकांत ११५ धावांत तंबूत परतला. सलामीवीर ओमैर युसूफ ( २४), रोहैर नाझीर ( १०), अराफत मिन्हास ( १३) आणि आमेर जमाल ( १४) हे वगळता पाकिस्तानच्या अन्य फलंदाजांनी अफगाणिस्तामसोर लोटांगण घातले. अफगाणिस्तानच्या फरीद अहमदने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. क्वैस अहमद व झहीर खान यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानकडून नूर अली झाद्रानने सर्वाधिक ३९ धावा केल्या. कर्णधार गुलबदीन नैबने ( 26*) अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करून अफगाणिस्तानला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानने १७.४ षटकांत ६ बाद ११६ धावा करून विजय मिळवला.

त्याआधी, मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये यंदाच्या वर्षीचे आणखी एक पदक पक्के केले. भारतानेबांगलादेशच्या संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव केला. बांगलादेशने पहिले फलंदाजी करताना २० षटकांत ९६ धावा केल्या होत्या. भारताने ९७ धावांचे आव्हान ९ गडी राखून ९.२ षटकांमध्ये पूर्ण केले आणि स्पर्धेच्या सुवर्णपदकाच्या शर्यतीत धडक मारली.