अयाज मेमनकन्सल्टिंग एडिटर
दुबई : उभय संघांदरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ आज, रविवारी आशिया चषक क्रिकेटच्या ‘सुपर फोर’ लढतीत पाकिस्तानवर फिरकीपटू त्रिकुटाच्या बळावर आणखी एक प्रभावी विजय नोंदविण्यास सज्ज आहे. भारत-पाक आमने सामने असतील तर दोन्ही संघांतील खेळाडू तणावात असतात. यावेळी हा तणाव वेगळ्या पातळीवर पोहोचला. दुसरीकडे पाकिस्तान संघ आणि त्यांचे चाहते या सामन्याकडे ‘खुन्नस’ म्हणून पाहत आहेत. मागच्या सामन्यात सात गड्यांनी मिळविलेल्या विजयात मोलाची भूमिका बजाविणारा सूर्या हा या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाज, रणनीतीकार कर्णधार तसेच भारतीय संघाचा राजदूत म्हणून उदयास आला आहे.
ओमानविरुद्धच्या सामन्यात झेल घेताना डोक्याला दुखापत झालेल्या अक्षर पटेलची काळजी करण्याची गरज नसल्याचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी म्हटले आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांना संधी देण्यात आली, पण गोलंदाजीत अर्शदीपसिंग आणि हर्षित राणा यांनी भरपूर धावा मोजल्याने पाकविरुद्ध ते बाहेर बसणार आहेत. वेगवान जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांचे पुनरागमन होईल. दोघेही ओमानविरुद्ध खेळले नव्हते. दुबई स्टेडियमवरील खेळपट्टी मंद गोलंदाजीला पूरक मानली जाते. अशावेळी कुलदीप यादव, वरुण आणि अक्षर पटेल यांच्यावर पाकच्या फलंदाजीचे पानिपत करण्याची जबाबदारी असेल. अक्षर पटेल न खेळल्यास वॉशिंग्टन सुंदर किंवा रियान पराग यापैकी एकाला संधी दिली जाईल.
पाकचा संघ अनपेक्षित कामगिरीसाठी ओळखला जातो. सध्याचा संघ फलंदाजीत फारच कमकुवत आहे. सध्याच्या संघातील फलंदाज तांत्रिकदृष्ट्या कमकुवत असल्याने फिरकीपटूसमोर त्यांचा निभाव लागत नाही. सलामीवीर सॅम अयूब हा दोनदा शून्यावर बाद झाला. त्याने गोलंदाजीत मात्र बळी घेतले. साहिबजादा फरहान, सहन नवाज आणि शाहीन शाह आफ्रिदी हे धावा काढत आहेत. फखर झमान आणि आफ्रिदी हे दोनच खेळाडू भारतीय संघाचे आव्हान पेलताना दिसत आहेत.
अभिषेकची आक्रमक फटकेबाजी रोखण्याचे आव्हान आफ्रिदीपुढे असेल. पाकने भारताविरुद्ध सूफियान मुकीम याला तिसरा फिरकीपटू म्हणून संधी दिली होती. मात्र, आज हारिस रौफ या वेगवान गोलंदाजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. रौफने यूएईविरुद्ध अर्धशतक ठोकले होते. संजू सॅमसन याने ओमानविरुद्ध अर्धशतक ठोकले. शुभमन गिल हा पुन्हा लवकर बाद झाला. पाकविरुद्ध शुभमनला तिसऱ्या स्थानावर न खेळवता कर्णधार सूर्या स्वत: या स्थानावर फलंदाजीला येईल, असे मानले जात आहे.
भारताला भूमिकेवर राहावे लागेल ठामभारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जी भूमिका घेतली त्यांना आता त्याच भूमिकेनुसार चालावे लागेल. पाकिस्तानला नमवल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने हा विजय भारतीय लष्कराला आणि पहलगाममधील मृतांना समर्पित केल्याचे सांगितले. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंना हस्तांदोलन केले नाही.
यामध्ये दोन्ही देशाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करावे असा नियम नसला, तरीही दोन्ही कर्णधारांनी हस्तांदोलन करायला हवे. पण, यामध्ये दोन्ही देशांच्या खेळाडूंची काहीही चूक नाही. पण, आता भारताला या भूमिकेवर कायम राहावे लागेल. दोन्ही देशांचे खेळाडू सुपर फोरमधील सामन्यात कशा प्रकारे खेळतील, याची उत्सुकता आहे. हस्तांदोलनाच्या घटनेनंतर सामनाधिकारी अँडी पायक्राॅफ्ट यांना हटवावे, अशी पाकिस्तानने मागणी केली, पण आयसीसीने तीही फेटाळून लावली.
पाकने माध्यमांना टाळलेभारताविरुद्ध लढतीआधी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने हजेरी लावली, त्याचवेळी पाकने पत्रकार परिषद रद्द केली. ॲण्डी पायक्रॉफ्ट आणि हस्तांदोलन वादावरील प्रश्नांना बगल देण्यासाठी पाकने हे पाऊल उचलल्याचे स्पर्धेच्या सूत्रांनी सांगितले.
पायक्रॉफ्टच सामनाधिकारीभारत-पाक सुपर फोर लढतीत झिम्बाब्वेचे ६९ वर्षांचे ॲन्डी पायक्रॉफ्ट हेच सामनाधिकारी असतील, असे आयसीसीने स्पष्ट केले. पीसीबीने वारंवार त्यांच्या उचलबांगडीची मागणी केली होती. या स्पर्धेत दुसरे सामनाधिकारी वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार रिची रिचर्डसन हे आहेत.