Mohnsin Naqvi vs Team India Asia Cup 2025 Trophy Controversy: भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धा २०२५च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला. पण पाकिस्तानचे मंत्री असलेले आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास टीम इंडियाने नकार दिला. त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफी न देता, नक्वी ती ट्रॉफी आणि मेडल्स स्वत:कडे घेऊन गेले. या गोंधळानंतर आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोहसीन नक्वी यांच्या वर्तनाचा ACCच्या बैठकीत निषेध केला. याचदरम्यान, एक अशी गोष्ट घडली, ज्यामुळे नक्वी यांना टीम इंडियापुढे गुडघे टेकावेच लागले आणि भारताचा मोठा विजय झाला.
मोहसीन नक्वी यांची बैठकीत नाचक्की
सीएनएन-न्यूज१८ नुसार, बोर्ड सदस्यांकडून नक्वी यांच्यातर्फे भारताने जेतेपद जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन करावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण भारताच्या आशिया कप विजयानंतर मोहसीन नक्वी यांनी केलेले विचित्र कृत्य पाहता, त्यांना भारतीय संघाचे अभिनंदन करणे काहीसे जड गेले. या लज्जास्पद कृत्यानंतर त्यांना काहीही पर्याय उरला नाही. नक्वी यांना भारतीय संघाचे विजेतेपदासाठी अभिनंदन करावेच लागले. म्हणजेच, आज त्यांनी सगळ्यांसमोर पुन्हा एकदा टीम इंडिया आशिया चषक विजेता असल्याचे मान्य केले. त्यामुळे आज बैठकीत त्यांची चांगलीच नाचक्की झाली.
मोहसीन नक्वी यांची ट्रॉफीसाठी अट
प्रचंड टीका झाल्यानंतर मोहसीन नक्वी यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना ट्रॉफी आणि विजेत्यांची मेडल्स देण्याची तयारी दाखवली असल्याचे वृत्त क्रिकबझच्या हवाल्याने देण्यात आले आहे. ट्रॉफी आणि मेडल्स देण्यासाठी एक औपचारिक सोहळा आयोजित करण्यात यावा आणि त्या सोहळ्यात नक्वी स्वत:च्या हस्ते भारतीय संघातील खेळाडूंना आणि कर्णधाराला मेडल्स व ट्रॉफी प्रदान करतील, अशी अट मोहसीन नक्वी यांनी आयोजकांपुढे ठेवली आहे. सध्याची तणावाची परिस्थिती पाहता, असा औपचारिक सोहळा आयोजित होण्याची सध्यातरी कुठलीही चिन्हे नाहीत. त्यामुळे या नाट्यमय घडामोडी आणखी किती काळ सुरू राहणार, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.
भारताने जिंकला आशिया चषक
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम पाकिस्तानला फलंदाजीला बोलावले. सलामीवीर फरहान (५७) आणि फखर जमान (४६) या दोघांनी ८४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर सैम आयुबने १४ धावा केल्या. पाकिस्तानची धावसंख्या १ बाद ११३ असताना अयुब बाद झाला. त्यानंतर एकालाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. भारताकडून कुलदीप यादवने चार तर बुमराह, वरूण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले. १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा (५), सूर्यकुमार यादव (१) आणि शुबमन गिल (१२) स्वस्तात बाद झाले. संजू सॅमसनने तिलक वर्माच्या साथीने भागीदारी केली पण तो २४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर तिलक वर्मा (नाबाद ५३) आणि शिवम दुबे (३३) यांच्या भागीदारीने भारताला विजयासमीप आणले. अखेर रिंकू सिंगने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.पाकिस्तानच्या फहीम अश्रफने तीन तर शाहीन आफ्रिदी आणि अबरार अहमद यांनी एक-एक बळी घेतला.