IND vs PAK Asia Cup 2025 Schedule : आशिया कप २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळवली जाईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा टी२० स्वरूपात खेळवली जाईल. आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या तयारीचा भाग म्हणून ही स्पर्धा असेल. आगामी विश्वचषक भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहेत.
८ संघ सहभागी
आगामी आशिया कपमध्ये आठ संघ सहभागी होतील. त्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. स्पर्धेतील आठ संघांना प्रत्येकी चार संघांच्या दोन गटात विभागण्यात आले आहे.
भारत-पाकिस्तान एकाच गटात
८ संघांना २ वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आले आहे. भारत-पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. गट-अ मध्ये भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमानचा संघ आहे. गट ब मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँगचा समावेश आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होईल. पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळला जाईल.
भारताचे सामने कधी?
भारताचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी युएई विरुद्ध असेल. भारताचा दुसरा सामना १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होईल. तर तिसरा सामना १९ सप्टेंबर रोजी ओमान विरुद्ध होईल.