आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यावरून सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतर जोरदार वादावादी झाली आहे. भारतीय संघाने पाकिस्तानसोबत खेळू नये अशी मागणी देशातील जनतेची होती, तर सामन्यावेळी भारतीय कप्तानाने व सामन्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही, त्यावरून वाद झाला होता. एकीकडे भारत-पाकिस्तान एवढ्या टोकाची भूमिका घेत असताना आशिया कपमधील एक संघ असा निघाला आहे की, संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी आहेत.
आशिया कप २०२५ स्पर्धेत ओमानचा प्रवास संपला आहे. या संघात पाकिस्तानी वंशाच्या सहा खेळाडूंचा समावेश आहे, तर संघाचा कर्णधार जतिंदर सिंग मूळचा भारताच्या पंजाबमधील लुधियानाचा आहे. एवढेच नाही तर इतरही खेळाडू हे भारतीय वंशाचे आहेत. म्हणजेच भारत-पाकिस्तानमधून फाळणीनंतर विस्तवही जात नसताना दोन्ही देशाच्या खेळाडूंची मिळून एक टीम बनलेली आहे.
ओमानच्या संघात भारत आणि पाकिस्तानमधील खेळाडूंचे वर्चस्व आहे. भारतासोबतच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा आमिर कलीम, तसेच मोहम्मद नदीम, शकील अहमद, मोहम्मद इमरान, शाह फैसल आणि नदीम खान हे सर्व खेळाडू पाकिस्तानमध्ये जन्मलेले आहेत. यापैकी मोहम्मद इमरानचा गोलंदाजीचा ॲक्शन पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरसारखा असल्याचे म्हटले जाते. त्याला पाकिस्तानमध्ये संधी मिळाली नाही, त्यामुळे त्याने ओमानमधून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला.
तर कर्णधार जतिंदर सिंगशिवाय, आशिष ओडेडरा, करण सोनावले, विनायक शुक्ला, आर्यन बिष्ट आणि समय श्रीवास्तव हे भारतीय वंशाचे आहेत. या भारत-पाकिस्तानी खेळाडूंच्या संघाला आशिया कपमध्ये एकही विजय मिळविता आलेला नाही.